नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात संगमनेरमध्ये महिलांकडून हनुमान रथ ओढण्याची परंपरा उत्साहात साजरी!
संगमनेर (प्रतिनिधी): हनुमान जयंतीनिमित्त संगमनेर शहरात पारंपरिक उत्साहात मिरवणूक पार पडली. नगराध्यक्षा डॉ. मैथिली तांबे यांच्या नेतृत्वात माता-भगिनींनी वर्षानुवर्षे जपली जाणारी परंपरा पुढे नेत हनुमानाचा रथ ओढला.
मिरवणुकीत मोठ्या संख्येने महिला सहभागी झाल्या असून त्यांनी एकजुटीने रथ ओढत धार्मिक उत्साह व्यक्त केला. संगमनेरमध्ये महिलांकडून रथ ओढण्याची परंपरा 1929 पासून सुरू आहे. ब्रिटीश सत्तेच्या बंदीला न जुमानता झुंबरबाई अवसक यांनी पुढाकार घेत रथ ओढण्यास सुरुवात केली होती. त्यांच्या धाडसाने प्रेरित होऊन बंकाबाई परदेशी, लीला पिंगळे यांसह अनेक महिलांनी सहभाग घेतला आणि ही परंपरा आजतागायत सुरू आहे.
हनुमान जयंतीच्या निमित्ताने होणाऱ्या सर्व धार्मिक विधींमध्ये महिलांचा सक्रिय सहभाग असतो. स्त्रीशक्ती आणि धैर्याचे प्रतीक म्हणून ओळखली जाणारी ही परंपरा पाहण्यासाठी दरवर्षी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित राहतात.
यावेळी संगमनेरचे आमदार अमोल खताळ, माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे, डॉ. जयश्री थोरात यांच्यासह शहरातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.