छगन भुजबळांच्या प्रयत्नांतून ५ नळ पाणीपुरवठा योजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता

जलजीवन मिशन अंतर्गत वनसगाव, वाहेगाव, अंदरसुल, बाळापूर व शिरवाडे वाकद येथील नागरिकांना मुबलक पाणीपुरवठा सुनिश्चित होणार

नाशिक, येवला, दि. २२ एप्रिल :- राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून जलजीवन मिशन अंतर्गत येवला मतदारसंघातील निफाड तालुक्यातील तांत्रिक बदल झालेल्या वनसगाव, वाहेगाव ,शिरवाडे वाकद आणि येवला तालुक्यातील अंदरसुल, बाळापूर येथील नळ पाणी पुरवठायोजनांना सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे. त्यामुळे लवकरच ही कामे पूर्ण होईल आणि येथील नागरिकांना मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे.

राज्याचे माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांतून येवला मतदारसंघात प्रत्येक नागरिकांना नळाद्वारे मुबलक स्वरूपात पाणी पुरवठा होण्यासाठी विविध योजना राबविल्या जात आहे. यामाध्यमातून जलजीवन मिशन अंतर्गत येवला मतदारसंघातील वनसगाव, वाहेगाव अंदरसुल, बाळापूर व शिरवाडे वाकद येथील नळ पाणी पुरवठा योजना मंजूर करण्यात आलेल्या होत्या. मात्र योजनेतील विविध तांत्रिक बदलांमुळे सुधारित प्रशासकीय मान्यता देण्यासाठी माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांचा पाठपुरावा सुरू होता. त्यानुसार मतदारसंघातील वनसगाव, वाहेगाव अंदरसुल, बाळापूर व शिरवाडे वाकद येथील नळ पाणी पुरवठा योजनेस सुधारित प्रशासकीय मान्यता प्राप्त झाली आहे.

या सुधारित प्रशासकीय मान्यतेनुसार वनसगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी मूळ ढोबळ अंदाजपत्रक १७६.२४ वरून १९९.८० लाख, वाहेगाव नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ३५.२८ वरून ७४.७८ लाख, अंदरसुल नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ९८.८४ वरून १९०.७६ लाख, बाळापुर नळ पाणीपुरवठा योजनेसाठी ४९.८६ वरून ९५.२३ लाख तर शिरवाडे वाकद नळ पाणीपुरवठा योजनेसाठी १५०.२२ वरून १९८.६१ लाख रुपयांच्या सुधारित अंदाजपत्रकास प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. लवकरच या योजनांमधील तांत्रिक बदल झालेल्या उर्वरित कामांना सुरुवात होऊन योजनांची कामे पूर्ण होणार आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.