खासदार हरवलेत, शोधा अन् मिळवा शंभर रुपये बक्षीस!
शिरूर | शिरुरचे खासदार (Shirur MP) हरवलेत, खासदारांना शोधा आणि रोख बक्षीस मिळवा, या फलकाने सध्या पाबळ-केंदूर-चौफुला ते वढु बुद्रुक रस्ता येणा-या जाणारांचे लक्ष वेधून घेत आहे. संभाजी महाराजांच्या नावाने मते मागून निवडून आलात, पण संभाजी महाराजांच्या समाधीकडे जाणा-या रस्त्याला निधी आणला नाहीत, असे म्हणत वढु बुद्रुक रस्त्यावरील खड्ड्यांच्या परिसरात लावलेल्या या फलकांवर खासदारांच्या नावाने १०० रुपयांचे बक्षीसही जाहिर केले आहे.
फलकावरील संपूर्ण मजकुराचा रोख खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचेवर असला तरी त्यांचा थेट कुठेही उल्लेख केला नाही हे विशेष. शिरुर-तालुक्यातील सर्वात दुर्लक्षित आणि तितकाच सर्वाधिक चर्चेचा रस्ता म्हणजे कोरेगाव भिमा-वढु बुद्रुक-वाजेवाडी-चौफुला-केंदूर-पाबळ हा आहे. गेली २० वर्षे या रस्त्यासाठी अनेक आंदोलने झाली. उपमुख्यमंत्री अजित पवार, २०११ मध्ये सार्वजनिक बांधकाम मंत्री असलेले छगन भुजबळ यांनी तत्कालीन विधानसभा अध्यक्ष दिलीप वळसे-पाटील यांच्या उपस्थितीत हा रस्ता केंद्रीय रस्ता निधीत घेवू, असे केंदूर (ता.शिरूर) येथे येवून जाहिर पणे सांगितले होते.
माजी खासदार शिवाजीराव आढळराव यांनीही हा रस्ता मी करुन घेणार, असे खुप वेळा या भागाला आश्वासन दिले होते. सर्वपक्षीय नेत्यांच्या या भूलथापा ठरल्या आणि प्रत्येक निवडणूकीपूर्वी हा रस्ता पुन्हा चर्चेत येतो तो राजकीय मुद्दा म्हणूनच. आता लवकरच जिल्हा परिषद निवडणूक होणार आहे. त्या पार्श्वभूमिवर गेल्या चार दिवसांपासून या रस्त्यावरील फलक राजकीय चर्चेसाठी दिसू लागला आणि यावेळी टार्गेट ठरलेत ते खासदार डॉ.अमोल कोल्हे. अर्थात या संपूर्ण फलकावर कुठेही खासदार कोल्हे यांचा नामोल्लेख नाही.