केंद्रीय अर्थसंकल्प २०२६: पुण्याच्या विकासाला नवी दिशा – नगरसेवक सनी निम्हण
पुणे | प्रतिनिधी
केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ मध्ये पुणे शहराच्या विकासासाठी ऐतिहासिक तरतुदी करण्यात आल्याचे मत नगरसेवक सनी निम्हण यांनी व्यक्त केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी सादर केलेला हा अर्थसंकल्प महाराष्ट्रासह पुण्यासाठी विकासाची नवी दारे उघडणारा असल्याचे त्यांनी सांगितले.
नगरसेवक सनी निम्हण यांनी अर्थसंकल्पाचे स्वागत करताना सांगितले की, पुण्याच्या वाढत्या महत्त्वाची दखल घेत केंद्र सरकारने पुण्याला ‘ग्रोथ हब’ म्हणून विकसित करण्याचा निर्णय घेतला असून, यासाठी पुढील पाच वर्षांसाठी ५,००० कोटी रुपयांचे विशेष पॅकेज जाहीर करण्यात आले आहे. यामुळे उद्योग, रोजगार आणि पायाभूत सुविधा विकासाला मोठी चालना मिळणार आहे.
पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा विषय असलेल्या पुणे मेट्रो प्रकल्पासाठी ५१७ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याचे नमूद करत सनी निम्हण म्हणाले की, खडकवासला ते वाघोलीसारख्या नव्या मार्गांच्या कामांना यामुळे वेग मिळेल. तसेच मुंबई–पुणे आणि पुणे–हैदराबाद हायस्पीड रेल्वे कॉरिडॉरमुळे पुण्याची दळणवळण व्यवस्था अधिक आधुनिक आणि वेगवान होणार आहे.
यासोबतच आयटी व ऑटोमोबाईल क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी विशेष सवलती, तसेच पुण्यात वर्किंग वुमन हॉस्टेल्स उभारण्याच्या निर्णयाचेही सनी निम्हण यांनी स्वागत केले. या तरतुदींमुळे महिला रोजगाराला आणि स्टार्टअप संस्कृतीला मोठे प्रोत्साहन मिळेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
एकंदरीत, केंद्रीय अर्थसंकल्प २०२६ हा पुण्याच्या सर्वांगीण विकासाला बळ देणारा, शहराला आत्मनिर्भर आणि भविष्याभिमुख बनवणारा ठरेल, असे सनी निम्हण यांनी स्पष्ट केले आहे.