उत्तर महाराष्ट्रात भाजप थोरला! ३५पैकी ३३ जागांवर महायुतीचा दणदणीत विजय, महाविकास आघाडीचा सुफडासाफ.
महायुतीच्या झंझावातात उत्तर महाराष्ट्रात महाविकास आघाडीची धुळधाण उडाली असून, ३५ पैकी तब्बल ३३ जागांवर महायुतीला यश मिळाले आहे. यात भाजपने सर्वाधिक १६ जागा जिंकल्या असून, शिवसेना शिंदे गट ९ जागा मिळवून दुसऱ्या क्रमांकावर राहिला. राष्ट्रवादी अजित पवार गटानेही आठ जागा जिंकल्या असून, त्यात नाशिक जिल्ह्याचा वाटा सर्वांत मोठा आहे. गेल्या वेळेस पाच जागांवर असलेल्या काँग्रेसचे अस्तित्व आता अवघ्या एका जागेवर राहिले असून, एमआयएमलाही दोनपैकी एक जागा गमवावी लागली आहे. मंत्री दादा भुसे, छगन भुजबळ, डॉ. विजयकुमार गावित, गिरीश महाजन, अनिल पाटील आणि गुलाबराव पाटलांनी आपली प्रतिष्ठा राखली आहे.
महायुती सरकारमधील दादा भुसे, छगन भुजबळ, गिरीश महाजन, अनिल पाटील, गुलाबराव पाटील आणि डॉ. विजयकुमार गावित यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, या सर्वच दिग्गजांनी आपले गड मोठ्या मताधिक्यांनी राखताच, जिल्ह्यातील राजकारणावरील आपली ताकदही वाढवली आहे. नाशिकमधून भुसेंनी लाखाच्या फरकाने, तर भुजबळांनी २५ हजारांपेक्षा अधिक मतांनी विजय मिळवला आहे. जळगावमधून महाजन, गुलाबराव पाटील, अनिल पाटलांनी आपले गड शाबूत ठेवले आहे. नंदुरबारमध्ये डॉ. गावितांनी तब्बल ७५ हजारांनी मताधिक्य घेऊन जिल्ह्याच्या राजकारणातील स्थान अधिक घट्ट केले आहे
प्रमुख पराभूत
■ के. सी. पाडवी (काँग्रेस)
■ कुणाल पाटील (काँग्रेस)
■ रोहिणी खडसे (शरद पवार गट)
■ समीर भुजबळ (अपक्ष)