ईडी, सीबीआय या यंत्रणांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचा ताकदीने लढणार
मुंबई | केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करून राज्यातील राजकीय नेत्यांना त्रास देण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. अंमलबजावणी संचालनालय, केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभाग (सीबीआय), प्राप्तिकर विभाग आदी केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात ताकदीने लढण्याचा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसने मंगळवारी घेतला.
राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्षाच्या मंत्र्यांची बैठक मंगळवारी मुंबई येथे पार पडली. प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील यांसह पक्षाचे सर्व प्रमुख नेते या वेळी उपस्थित होते. प्राप्तिकर विभागाने अजित पवार यांच्या कुटुंबियांच्या मालमत्तांवर नुकतेच छापे घातले. माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या मागे कें द्रीय यंत्रणा हात धुऊन मागे लागल्या आहेत. हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रोरी करण्यात आल्या आहेत. भाजप नेत्यांकडून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची नावे घेण्यात येत आहेत. केंद्रीय यंत्रणा या राज्यातील भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर चालतात, असाच पक्षाच्या नेत्यांचा सूर होता.
राष्ट्रीय अमली पदार्थविरोधी विभाग (एन.सी.बी.) भाजप नेत्यांच्या इशाऱ्यावर कसा कारभार करतो हे नवाब मलिक यांनी निदर्शनास आणून दिले आहे. केंद्रीय यंत्रणांकडून राष्ट्रवादीच्या नेत्यांना कसे लक्ष्य के ले जात आहे यावर सविस्तर चर्चा झाली. या यंत्रणांच्या विरोधात ताकदीने लढण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे नवाब मलिक यांनी सांगितले.