आमदार सत्यजीत तांबे यांच्या पाठपुराव्याला यश; हरिबाबा देवस्थानला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा
देवस्थान परिसरातील सुशोभीकरण, पार्किंग, स्वच्छतागृहे, पाण्याच्या सोयी, निवास व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांच्या विकासकामांना गती
संगमनेर, १३ जून : नाशिक-पुणे महामार्गावरील वेल्हाळे (ता. संगमनेर) येथील प्रसिद्ध हरिबाबा देवस्थानाला शासनाकडून ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्यात आला आहे. हा निर्णय भाविकांसाठी आनंदाचा आहे, आमदार सत्यजीत तांबे यांनी सातत्याने केलेल्या पाठपुराव्यामुळे हा मान मिळाला असून, आता मंदिर परिसरात भाविकांसाठी विविध सुविधा व सुशोभीकरणाच्या कामांना गती मिळणार आहे. कारण यामुळे देवस्थान परिसरातील विकासकामांना गती मिळणार आहे. या दर्जामुळे येथे सुशोभीकरण, पार्किंग, स्वच्छतागृहे, पाण्याच्या सोयी, निवास व्यवस्था यांसारख्या मूलभूत सुविधांवर लक्ष केंद्रित केले जाईल.
हरिबाबा देवस्थान हे संगमनेर तालुक्यातील एक प्रमुख धार्मिक आणि सांस्कृतिक केंद्र आहे. मालदाड, सायखिंडी, गुंजाळवाडी, कारखाना यासह जवळपासच्या अनेक गावांतील भाविक येथे नियमितपणे दर्शनासाठी येतात. दरवर्षी येथे भरपूर उत्साहात जत्रा भरते आणि विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. मात्र, गेल्या काही वर्षांत भाविकांची संख्या वाढल्यामुळे मूलभूत सुविधांमध्ये तूट निर्माण झाली होती.
या पार्श्वभूमीवर, संगमनेर विधानसभा मतदारसंघातील आमदार सत्यजीत तांबे यांनी हरिबाबा देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळावा यासाठी सातत्याने प्रयत्न केले. ३० जानेवारी २०२५ रोजी त्यांनी जिल्हा नियोजन समितीकडे औपचारिक पत्र सादर करून यासंदर्भातील तपशीलवार प्रस्ताव मांडला होता. त्यानंतर त्यांनी सातत्याने या मुद्द्यावर पाठपुरावा केला. अखेर, अहिल्यानगर येथे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत हरिबाबा देवस्थानाला ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामुळे वेल्हाळे, सायखिंडी, मालदाड, घुलेवाडी, अमृतनगर, गुंजाळवाडी, चिकणी, राजापूर, क-हे, सुकेवाडी या परिसरातील ग्रामस्थांमध्ये समाधानाची लाट पसरली आहे. ग्रामस्थांनी माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि आमदार सत्यजीत तांबे यांचे या यशासाठी अभिनंदन केले आहे.
माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांनी यापूर्वीच या परिसरातील खांडेश्वर, निजरनेश्वर, बाळेश्वर, दुधेश्वर, तळेगाव यांसारख्या देवस्थानांचा पर्यटनदृष्ट्या विकास केला आहे. हरिबाबा देवस्थान हे तालुक्यातील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ असल्याने, थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली येथे भाविकांसाठी आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.
या संदर्भात आमदार सत्यजीत तांबे यांनी सांगितले, “हरिबाबा देवस्थान हे संगमनेर तालुक्यातील भाविकांच्या श्रद्धेचे प्रमुख केंद्र आहे. येथील भाविकांना सुविधा मिळाव्यात यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केले. आता ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्यामुळे येथील विकासकामांना चालना मिळेल. यामागे माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचे मार्गदर्शनही महत्त्वपूर्ण आहे.”
या निर्णयामुळे हरिबाबा देवस्थानाच्या परिसरातील विकासकामांना प्राधान्य मिळेल आणि भाविकांना अधिक सोयीस्कर वातावरणात दर्शनाची संधी मिळणार आहे.