मशीनमध्ये ओढणी अडकल्याने गळफास लागून २१ वर्षीय महिलेचा मृत्यू
लग्नाला झाले होते अवघे ६ महिने...
मंचर | कडबा कुट्टीच्या मशीनमध्ये ओढणी गुंतून गळफास लागल्याने २१ वर्षाच्या महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना लाखनणगाव (ता. आंबेगाव) येथे मंगळवारी सकाळी घडली. सोनाली अजय दौंड (वय २१) असे मृत पावलेल्या महिलेचं नाव आहे. त्यांचा विवाह ६ महिन्यापूर्वी झाला होता. या घटनेने या परिसरात शोककळा पसरली असून लोक हळहळ व्यक्त करत आहे.
मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लाखणगाव येथील गव्हाळी मळ्यात राहणाऱ्या सोनाली अजय दौंड यांचा विवाह सहा महिन्यापूर्वी झाला होता. दौंड कुटुंबियांचा दुग्ध व्यवसाय असून सकाळी सोनाली जनावरांचे खाद्याची कुट्टी करण्यासाठी गोठ्यात गेली होती. त्यावेळी आजूबाजूला कुणीही नव्हते. कुटीमध्ये पेंढी घालत असताना पेंढी बरोबर तिचा दुपट्टा आतमध्ये ओढला गेला. दुपट्टाची दोन्ही बाजू आत गेल्याने तिला गळफास बसून या घटनेत तिचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.
सुभाष दौंड हे शेतात मेथीला तणनाशक मारण्यासाठी गेले होते. त्यावेळी नवनाथ लक्ष्मण रोडे व वैभव रामदास पडवळ यांनी घटनेची माहिती त्यांना दिली. सुनील दौंड यांनी सोनाली दौंड याची कडबा कुट्टी मशीन मधून सुटका करून घराच्या बाहेर आणले परंतु त्या कुठलीही हालचाल करत नव्हत्या. सुरुवातीला पारगाव व नंतर मंचर उपजिल्हा रुग्णालयात त्यांना उपचारासाठी आणण्यात आले. मात्र उपचारापूर्वीच त्या मरण पावल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
सुभाष दौंड यांनी दिलेल्या माहितीनुसार पोलिसांनी घटनेची नोंद घेतली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पुढील तपास मंचर पोलीस करत आहेत. सुभाष सोपान दौंड यांनी मंचर पोलिसात हि माहिती दिली आहे.