पप्पा कुठे आहेत? पोरांचा आईला भाबडा प्रश्न; सासूला संशय, बेडखाली पाहिलं तर…
उत्तर प्रदेशच्या कानपूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका महिलेनं तिच्या पतीची गळा दाबून हत्या केली. त्यानंतर तिनं मृतदेह घरातच खड्डा खणून गाडला. दोन दिवसांपासून वडील न दिसल्यानं मुलांनी आईकडे विचारणा केली. पतीचा मृतदेह दफन केलेल्या खोलीत महिला कोणालाच जाऊ देत नव्हती. त्यामुळे तिच्या सासूला संशय आला. तिनं खोलीत जाऊन पाहिलं. त्यावेळी तिला बेडखालची जमीन उकरलेली दिसली.
मृताच्या कुटुंबीयांनी घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून खड्डा खणला आणि मृतदेह बाहेर काढला. त्यानंतर मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. फॉरेन्सिक पथकानं घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा केले. पोलिसांनी आरोपी पत्नीला अटक केली आहे. मोनिका असं तिचं नाव आहे. मोनिकानं तिचा पती उमेशची हत्या केली.
बिधनू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुरौल गावात ही घटना घडली. सुरौल गावात राहणारे उमेश यादव शेती करतात. पत्नी मोनिका, मुलगी लिया (८) आणि मुलगा उत्कर्ष (५) असा त्यांचा परिवार आहे. बुधवारी मम्मी, पप्पांचं भांडण झाल्याचं लियानं सांगितलं. पप्पांनी मम्मीच्या कानाखाली मारली. त्यानंतर भांडण सुरू झालं. त्यांचं भांडण सुरू असताना मी भावासोबत शाळेत गेले, असा घटनाक्रम लियानं सांगितला.
शाळेतून आल्यावर लियानं आईकडे पप्पांबद्दल विचारणा केली. त्यावर पप्पा कानपूरला गेल्याचं मोनिकानं तिला सांगितलं. यानंतर मोनिकानं जेवण देऊन दोन्ही मुलांना झोपवलं. ‘गुरुवारी सकाळीदेखील पप्पा कुठेच दिसले नाहीत. मी मम्मीला पुन्हा पप्पांबद्दल विचारलं. पण ती काहीच बोलली नाही. मम्मी घरातील एका खोलीत कोणालाच जाऊ देत नव्हती,’ असं लिया म्हणाली.
दोन दिवसांपासून उमेश दिसत नसल्यानं त्याच्या आईला चिंता वाटू लागली. त्यामुळे तिला शंका आली. काही नातेवाईकांना घेऊन त्या उमेशच्या घरी पोहोचल्या. पण मोनिकानं दार उघडलं नाही. याची माहिती त्यांनी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून दार उघडलं. त्यावेळी खड्ड्यात उमेश यांचा मृतदेह सापडला. मोनिकानं उमेश यांची गळा दाबून हत्या केली आणि मृतदेह घरातच खड्डा खणून गाडल्याचं पोलिसांनी सांगितलं.