डिजीलॉकर मध्ये प्रसिद्ध केलेली कागदपत्रं शैक्षणिक संस्थांनी वैध कागदपत्रं म्हणून स्विकारावीत UGC चे संस्थांना आदेश
विविध कागदपत्रे डिजिटल स्वरूपात जतन करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डिजीलॉकर (DigiLocker) या प्लॅटफॉर्मवर प्रसिद्ध केलेल्या शैक्षणिक पदव्या, गुणपत्रिका यांसारखी शैक्षणिक कागदपत्रं वैध दस्तऐवज म्हणून गृहीत धरली जावीत, अशा सुचना विद्यापीठ अनुदान आयोगाने (UGC) उच्च शैक्षणिक संस्थांना केली आहे. नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी (NAD) हे डिजिटल स्वरूपातील शैक्षणिक दस्तऐवजांचं ऑनलाइन भांडार आहे. शिक्षण मंत्रालयाने NAD ला कायस्वरुपीची तरतूद म्हणून लागू करण्यासाठी सांगितल्यानंतर आयोगाने शैक्षणिक संस्थांना या सुचना दिल्या आहेत.
नॅशनल अॅकॅडमिक डिपॉझिटरी (NAD) हे शैक्षणिक कागदपत्रांचं ऑनलाइन भांडार आहे. यामुळे विद्यार्थ्यांना महाविद्यालय आणि बोर्डाकडून मूळ दस्तऐवज/प्रमाणपत्रं डिजिटल स्वरूपात कोणत्याही वेळी, कुठेही मिळवता येतात. शिक्षण मंत्रालयाने (MoE) DigilLocker च्या माध्यमातून विद्यार्थ्यांना कोणतेही शुल्क न आकारता कागदपत्रे मिळवण्यासाठी कायमस्वरूपीची तरतुद करण्यासाठीच्या सुचना UGC ला दिल्या आहेत. त्यामुळे आता विद्यार्थ्यांना आपली कागदपत्रं सहज उपलब्ध होणार आहेत. NAD कार्यक्रमाच्या मर्यादा वाढवण्यासाठी सर्व शैक्षणिक संस्थांना डिजीलॉकर मधून प्रसिद्ध केलेली पदवी, मार्कशीट आणि इतर कागदपत्रं वैध कागदपत्रं म्हणून स्वीकारण्याची विनंती केली असल्याचं UGC ने सांगितले आहे.