मी एकटा नाराज नाही भाजपचे ३० नगरसेवक नाराज राजीनामा दिल्यानंतर तुषार कामठे यांचा मोठा खुलासा

पिंपरी | पिंपरी सत्ताधारी भाजपचे फायरब्रँड नगरसेवक म्हणून ओळखले जाणारे तुषार कामठे यांनी नगरसेवकपदाचा राजीनामा दिल्यानंतर शुक्रवारी पत्रकार परिषदेतून मोठा खुलासा केला आहे. नाराज असलेले ते एकमेव नगरसेवक नाहीत, भाजपच्या अशा नगरसेवकांची संख्या 30 च्या जवळपास आहे, असा दावा त्यांनी केला आहे. आपली नाराजी भाजपवर नसून स्थानिक नेत्यांवर असल्याचेही कामठे यांनी स्पष्ट केले. पक्षातील स्थानिक नेत्यांना ठेकेदार ठरवत कामठे यांनी पिंपरी चिचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपच्या ‘प्रभारी’ दोन्ही आमदारांना आव्हान दिले आहे की, शहरातील विकासकामे आमदार निधीतून झाली की राज्य सरकारच्या बजेटमधून? आमदारांकडून जी विकासकामे करण्याचा दावा केला जात आहे, ती सर्वच कामे महापालिकेच्या माध्यमातून झाल्याचा दावा त्यांनी केला. स्थानिक नेत्यांची मनमानी, हुकूमशाही, हिटलरशाही आणि भ्रष्ट कारभारामुळे पक्षातील अनेक नगरसेवक नाराज झाले आहेत. अशा नगरसेवकांची संख्या 30 असून त्यांची नाराजी पक्षावर नसून नेत्यांवर आहे असे तुषार कामठे यांनी यावेळी सांगितले.

आपण केवळ नगरसेवकपदाचा राजीनामा दिला असून भाजपचे सदस्यत्व सोडले नसल्याचेही कामठे यांनी स्पष्ट केले. कोणत्या पक्षात प्रवेश घ्यायचा याचा निर्णय अद्याप झालेला नसून आठ दिवसांत निर्णय होईल, असे ते म्हणाले. केवळ पाणी, रस्ते आणि वीज म्हणजे विकास नाही, असे सांगत कामठे यांनी त्या आधारे प्रसिद्धीचे ढोल पिटणाऱ्या भाजप नेत्यांना जोरदार खडसावले. बाकीचे नाराज भाजप नगरसेवक काही तरी अडचण असल्याने गप्प आहेत. मला पद नको आहे, मला काही अडचण नाही. म्हणूनच मी पुढे येऊन बोलत आहे. सेक्युअर आयटी सोल्युशन कंपनीच्या भ्रष्टाचाराविरोधात, रस्त्यांवरील पिण्याच्या पाण्याच्या प्रश्नावर, महापालिकेच्या सभांमध्ये आणि गरज पडेल तेव्हा 55 कोटींच्या भ्रष्टाचाराविरोधात मी वेळोवेळी आंदोलने केली आहेत असे कामठे यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.