30 दिवसांची वैधता असणारा किमान तरी प्लॅन असावा TRAI चे दूरसंचार कंपन्यांना निर्देश
भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण ( TRAI ) ने दूरसंचार कंपन्यांना 30 दिवस किंवा एक महिन्याची वैधता असलेले कमीत कमी एक टॅरिफ प्लॅन असणे बंधनकारक केले आहे. TRAI ने टॅरिफवरील दीर्घकालीन धोरणात बदल केला आहे. 1999 च्या दूरसंचार आदेशात बदल करताना, ट्रायने गुरुवारी सांगितले की, “प्रत्येक दूरसंचार सेवा प्रदात्याने किमान एक प्लॅन व्हाऊचर, एक विशेष टॅरिफ व्हाऊचर आणि तीस दिवसांची वैधता असलेले एक कॉम्बो व्हाऊचर ऑफर केले पाहिजे. जे प्रत्येक महिन्याच्या त्याच तारखेला नूतनीकरण करण्यायोग्य असेल.”
TRAI ने या दूरसंचार आदेशातील ग्राहकांना अनुकूल बदलाचे स्पष्टीकरण दिले आहे. दूरसंचार ग्राहकांना योग्य वैधता आणि कालावधीच्या सेवा ऑफर निवडण्यासाठी अधिक पर्याय मिळतील. यामुळे ग्राहकांना टॅरिफ-संबंधित अधिक माहितीपूर्ण निवड करण्यास मदत होईल. TRAI ने गेल्या वर्षी मे महिन्यात एक सल्लापत्र तयार केले होते, ज्यामध्ये सर्व संबंधितांना विचारले होते की त्यांनी या प्रकरणात हस्तक्षेप करावा का. TRAI ला ग्राहकांच्या असंख्य तक्रारी प्राप्त झाल्या आहेत ज्यात ग्राहकांनी म्हंटले आहे की त्यांना मासिक प्लॅनसाठी एका वर्षात 13 रिचार्ज करावे लागले आहेत, त्यामुळे त्यांची फसवणूक झाली आहे असे दिसते.