‘Together Against Drugs’ अभियानाचे उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते उद्घाटन

माजी नगरसेवक सनी निम्हण यांनी या अभिनव उपक्रमासाठी घेतला पुढाकार

ब्युरो टीम : जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त माजी नगरसेवक सनी निम्हण यांच्या संकल्पनेतून व सोमेश्वर फाउंडेशनच्या वतीने तरुण पिढीला ड्रग्स आणि अमली पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी दीर्घकालीन, Together Against Drugs (TAD) ही व्यापक जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या जनजागृती मोहिमेचा शुभारंभ राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या हस्ते संभाजी पार्क जंगली महाराज रस्ता येथे करण्यात आला. याप्रसंगी शहरातील कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेचे व्यंगचित्रकारांनी एकत्र येऊन ‘अमली पदार्थांच्या विरोधात लढू या’ असा संदेश आपल्या प्रात्यक्षिक व्यंगचित्रांच्या माध्यमातून पुणेकरांना दिला आहे.

यावेळी बोलताना मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, पब, बियरबार आठवड्यातील ठराविक दिवस बंद करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येऊन नियमावली केली पाहिजे, तसेच  रात्री किती वाजेपर्यंत चालवले पाहिजे याबाबत निर्णय घ्यावा. एखादी घटना घडल्यावर केवळ प्रशासनाने कारवाई न करता त्याबाबत नियमित कारवाई करणे गरजेचे आहे.उच्च शिक्षण विभागातर्फे राज्यातील प्रत्येक महाविद्यालयात अंमली पदार्थ विराेधी जनजागृती करण्यात येईल. सर्व पब, बार हे बंद केले पाहिजेत. ते किराणा दुकानांसारखे गरजेचे नाही. विषारी दारु बनविणाऱ्या ठिकाणचे कर्मचारी बेराेजगार हाेतील म्हणून त्यांना उद्याेग करुन द्यावा असे हाेऊ शकत नाही. त्याप्रमाणे पब मधील कर्मचारी बेराेजगार हाेतील तर त्यांना दुसरा राेजगार दिला पाहिजे. पहाटे 4 वाजेपर्यंत पब सुरु ठेवता येणार नाही, अल्पवयीन मुलांना दारु, ड्रग देता येणार नाही. त्यामुळे पबवाल्यांनी बाेलताना भान ठेवावे नियमाचे चाैकटीत व्यवसाय करावा, असे ते म्हणाले.

पाटील म्हणाले, व्यंगचित्र माध्यमातून अंमली पदार्थ विराेधी जनजागृती करणे ही अभिनव कल्पना आहे. व्यसनाच्या आहारी न जाण्याचा संकल्प हे चित्र प्रदर्शन पाहून लाेक करतील. अंमली पदार्थाचे प्रमाण शहरात वाढत आहे परंतु 70 लाखांचे पुणे शहर हे वाया गेले असे चित्र रंगवले जात असून ते चुकीचे आहे. पुणे शिक्षणाचे माहेरघर असून अनेक नामांकित शैक्षणिक संस्था, उद्याेग, नावजलेले रुग्णालय पुणे शहरात आहे.

आपल्या पुण्याची खरी ओळख विद्येचे माहेरघर, राज्याची सांस्कृतिक राजधानी, आयटी व उद्योगनगरी अशीच आहे. परंतु सध्या पुणे शहर ड्रगच्या विळख्यात अडकले असल्याचे भीतीदायक वातावरण गेल्या काही दिवसात निर्माण झाले आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा देशपातळीवर मलीन होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यासाठी पुढाकार घेणे प्रत्येक पुणेकरांचे कर्तव्य आहे. चला लढा देऊया अमली पदार्थांना पुण्यातून हद्दपार करूया. असे मत यावेळी सनी दादा निम्हण यांनी मांडले आहे.

पुढे बोलताना Together Against Drugs (TAD) या मोहिमेत अमली पदार्थांच्या विरोधात जनजागृती, मार्गदर्शन, अमली पदार्थांच्या आहारी गेलेल्यांसाठी व्यसनमुक्ती व औषधोपचार देखील उपलब्ध करून दिले जाणार आहेत. हे अभियान एका दिवसापुरते मर्यादित न ठेवता सोमेश्वर फाउंडेशनच्या माध्यमातून निरंतर सुरु राहणार आहे. असेही सनी निम्हण यांनी म्हंटले आहे.

यावेळी मा. नगरसेवक आदित्य माळवे, मा. नगरसेवक अमित मुरकुटे , कार्टूनिस्ट कम्बाईन या संस्थेचे व्यंगचित्रकार व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

Leave A Reply

Your email address will not be published.