दुरावलेले सहकारी भेटले, एकत्रच प्रदर्शनाची पाहणी, पवारांच्या मनात अजूनही मोहितेंबद्दल हळवा कोपरा!
बारामतीतील ॲग्रिकल्चर डेव्हलपमेंट ट्रस्टच्या कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाची माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि भाजप नेते विजयसिंह मोहिते पाटील यांनी एकत्र पाहणी केली आणि माहिती घेतली. कृषी विज्ञान केंद्रातील कृषी प्रदर्शनाचा आजचा चौथा दिवस होता. या प्रदर्शनाला वेगवेगळ्या पक्षातील वेगवेगळ्या नेत्यांनी भेट दिली. विजयसिंह मोहिते पाटील यांनी काही वर्षापूर्वी राष्ट्रवादीला रामराम करत भाजपमध्ये प्रवेश केला होता. पण ते शरद पवारांसोबत दिसून आल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या.
राष्ट्रवादीपासून फारकत घेत भाजपवासी झालेल्या माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील हे आज राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यासोबत दिसून आले. विजयसिंह मोहिते पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत इलेक्ट्रीक कारमधून बारामतीत आयोजित कृषिक प्रदर्शनाची पाहणी केली. यावेळी राष्ट्रवादीचे पारनेरचे आमदार निलेश लंके ही त्यांच्यासोबत होते. मोहिते पाटील हे मोठ्या कालखंडानंतर शरद पवार यांच्यासोबत आणि तेही बारामतीत दिसू आल्याने त्याची प्रदर्शनामध्ये जोरदार चर्चा झाली.
शरद पवार आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील तसेच आमदार निलेश लंके यांनी कृषी प्रदर्शनाला धावती भेट दिली. या ठिकाणी शेतीतील नवीन प्रात्यक्षिके व नवीन तंत्रज्ञानाची माहिती त्यांनी तज्ज्ञांकडून घेतली. आणि यानंतर शरद पवार यांनी सायन्स पार्कमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. या देशातील बदल शेतकऱ्यांनी घडवला आहे. मागील पंधरा वर्षांत जी शेती विषयक धोरणं झाली त्यातून अन्नधान्याचं उत्पादन वाढलं आणि ते दिवसेंदिवस वाढतच आहे. २५२ दशलक्षावरून आज ३०० दशलक्षाच्या पुढे गेलेला अन्नधान्याचा साठा हा शेतकऱ्यांनी शेतीमध्ये अमुलाग्र बदल केल्याचंच दर्शवतो, असं शरद पवार म्हणाले.
कृषी प्रदर्शनामध्ये मला तरुणांबरोबरच काही माझ्या ओळखीचे हजारो शेतकरी भेटले. त्यांनाही हे नवे तंत्रज्ञान खुणावत आहे. तरुणांची या प्रदर्शनामधील संख्या पाहून मला अतिशय आनंद वाटला. शेतीतील हे नवे बदल टिपण्याबरोबरच आता नव्याने कृत्रिम बुद्धिमत्तेचे युग शेतीमध्ये सुरू होत आहे. त्या दृष्टीने बारामतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचे केंद्र सुरू होत आहे. याचा शेती आणि शेतीच्या क्रांतीमध्ये खूप मोठा बदल होईल आणि त्यासाठी त्याची मदत होईल असं मला वाटतं, असं पवार म्हणाले.
विजयसिंह मोहिते पाटील हे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणातील मातब्बर नेते समजले जातात. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून मोहिते पाटील हे पवारांसोबत होते. परंतु मध्यंतरीच्या काळात ते पक्षापासून दुरावले गेले. सध्या ते भाजपमध्ये आहेत. रविवारी त्यांनी पवारांसोबत कृषिक प्रदर्शनाची पाहणी केली. विजयदादा यांना कृषी क्षेत्राबद्दल आस्था आहे. त्यांच्यासह अनेक मान्यवरांनी कृषी प्रदर्शनाला भेट दिली आहे, असं शरद पवार यावेळी म्हणाले. विजयसिंह मोहिते पाटील यांची प्रकृती ठिक नसतानाही ते आले आणि आस्थेने आले, असंही शरद पवार यांनी आवर्जून नमूद केलं. राजकीय विचारू नका, असं यावेळी शरद पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं. मोहिते पाटील यांची प्रकृती ठीक नसल्याने ते काहीच बोलले नाही.