टाटा समूहात बिस्लेरी ची एन्ट्री, बिस्लेरी विकण्यामागचं कारण काय?
थम्स अप, गोल्ड स्पॉट लिम्का, कोका-कोला या सॉफ्ट ड्रिंक ब्रँडची विक्री केल्यानंतर जवळपास तीन दशकांनंतर, रमेश चौहान हे बिसलेरी इंटरनॅशनल कंपनी टाटा कंझ्युमर प्रॉडक्ट्स लिमिटेड ( TCPL ) ला अंदाजे 6,000 ते 7,000 कोटी रुपयांना विकत आहेत. करारानुसार, विद्यमान व्यवस्थापन आणखी दोन वर्षांसाठी कार्यरत राहील. 82 वर्षीय चौहान यांची तब्येत साथ देत नसल्याने आणि बिस्लेरीला विस्ताराच्या पुढील स्तरावर नेण्यासाठी त्यांच्याकडे उत्तराधिकारी नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे. त्यांची मुलगी जयंतीला या व्यवसायात फारसा रस नाही. असे चौहान यांचे म्हणणे आहे.
बिस्लेरी ही भारतातील सर्वात मोठी पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर कंपनी आहे. चौहान यांच्या मते टाटा समूह या कंपनीची व्यवस्थित देखभाल ठेवले आणि कंपनीची काळजी आणखी चांगल्या प्रकारे करेल. चौहान यांनी हा व्यवसाय खूप कष्टाने आणि तळमळीने उभा केला आहे आणि त्याच्या कर्मचार्यांनीही उत्कटतेने काम केले आहे. चौहान यांनी CEO अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक संघाकडे दैनंदिन व्यवस्थापन सोपवले आहे. FY23 साठी बिसलेरी ब्रँडची उलाढाल 220 कोटी रुपयांच्या नफ्यासह 2,500 कोटी रुपयांची आहे अशी माहिती चौहान यांनी दिली आहे.
चौहान यांच्यासाठी बिस्लेरी विकणे हा एक वेदनादायक निर्णय होता. याआधी रिलायन्स रिटेल, नेस्ले आणि डॅनोनसह अनेक कंपन्यांनी बिस्लेरी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला होता. टाटा यांच्याशी दोन वर्षांपासून चर्चा सुरू होती आणि त्यांनी काही महिन्यांपूर्वी टाटा सन्सचे अध्यक्ष एन चंद्रशेखरन आणि टाटा कंझ्युमरचे सीईओ सुनील डिसोझा यांची भेट घेऊन हा निर्णय घेतला आहे.
बिस्लेरी हा मूळचा इटालियन ब्रँड होता 1965 मध्ये बिस्लेरी ने मुंबई मधून भारतात प्रथम व्यापार सुरू केला. चौहान यांनी 1969 मध्ये या कंपनीचा ताबा घेतला. कंपनीचे 122 ऑपरेशनल प्लॅन्टस् आणि 4,500 वितरक आणि 5,000 ट्रकचे नेटवर्क भारत आणि शेजारील देशांमध्ये आहे.
Economics Times च्या अहवालानुसार, टाटा समूहाने 12 सप्टेंबर रोजी बिस्लेरीसाठी ऑफर दिली होती. या व्यवसायातून बाहेर पडल्यानंतर, चौहान यांनी पाणी साठवण, प्लास्टिक पुनर्वापर आणि गरिबांना वैद्यकीय उपचार मिळण्यास मदत करणे यासारख्या पर्यावरणीय आणि सामाजिक कार्यांमध्ये पुन्हा लक्ष केंद्रित करण्याचा आणि गुंतवणूक करण्याचा मानस व्यक्त केला आहे.
कोका-कोलाने 1993 मध्ये चौहान आणि त्यांचा भाऊ प्रकाश यांच्याकडून एरेटेड ड्रिंक्सचा संपूर्ण पोर्टफोलिओ विकत घेतला. ज्यामध्ये सिट्रा, रिमझिम आणि माझा या ब्रँडचा समावेश होता. टाटा कंझ्युमर फास्ट-मूव्हिंग कन्झ्युमर गुड्स (FMCG) या क्षेत्रात आक्रमकतेने पुढे जात आहे आणि या विभागातील पहिल्या तीनमध्ये येण्याचे त्यांचे उद्दिष्ट आहे. हिमालयन ब्रँड अंतर्गत पॅकेज्ड मिनरल वॉटर तसेच टाटा कॉपर प्लस वॉटर आणि टाटा ग्लुको+ हे प्रोडक्ट्स विकते. बिस्लेरीचे विकत घेतल्यानंतर, ते या क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर पोहोचतील असा अंदाज आहे.