भावाला सोडलं, घरी किराणा दिला अन् नंतर थेट तरुणाचा मृतदेह आढळला; मृत्यू प्रकरणाचे गूढ वाढले

भोकरदन तालुक्यातील पळसखेडा पिंपळे येथील रत्नदीप भांबळे हा २५ वर्षीय तरूण ३१ जानेवारी रोजी घरातून बाहेर पडला होता. परंतु संध्याकाळ झाली तरी घरी परत न आल्यामुळे नातेवाईकांनी शोधाशोध सुरू केली. बऱ्याच शोधानंतर रत्नदीप भांबळेचा मृतदेह आता एका विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरूणाच्या डोक्यात काठीने मारहाण करण्यात आली असून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. घटनेची माहिती पोलिसांना दिल्यावर हसनाबाद पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरूद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबतची सविस्तर माहिती अशी की, पळसखेडा पिंपळे येथील रत्नदीप भांबळे याने ३१ जानेवारी रोजी सकाळी ९ वाजेदरम्यान भाऊ अमर भांबळे यांना थिगळखेडा फाट्यावर बांधकामाच्या ठिकाणी कामावर सोडले. नंतर घरी किराणा सामान आणून दिला आणि दुपारी १ वाजेच्या दरम्यान रत्नदीप भांबळे मोटारसायकल घेऊन शेतात गेला. सांयकाळी ६ वाजेपर्यंत घरी न आल्यामुळे भावाने मोबाईलवर फोन केला असता त्याचा मोबाईल बंद लागला.

यानंतर नातेवाईकांनी पळसखेडा पिंपळे येथील गट नं. ७८ मधील शेतात जाऊन शोध घेतला असता त्यांना आंब्याच्या झाडाखाली रक्त सांडलेले दिसल्याने काही अघटीत घडल्याच्या शंकेने त्यांनी शोध घेतला. त्यानंतर बॅटरीच्या प्रकाशात चप्पल सापडली, तर रत्नदीप भांबळे यांचा मृतदेह विहिरीत पडलेला दिसून आला. सदर तरूणाच्या डोक्यात काठीने मारहाण करून त्याचा खून केला असून पुरावा नष्ट करण्यासाठी मृतदेह विहिरीत नेऊन टाकल्याचं स्पष्ट झालं आहे.

अमर भांबळे यांच्या फिर्यादीवरून हसनाबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी श्वान पथकास पाचारण करण्यात आले होते. घटनास्थळास पोलीस अधीक्षक अक्षय शिंदे, उपविभागीय पोलीस अधिकारी इंदलसिग बहुरे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुभाष भुजंग, सहायक पोलीस निरीक्षक संतोष घोडके आदींनी भेट दिली असून पोलीस उपनिरीक्षक फकीरचंद फडे यांच्या पथकाने पंचनामा केला आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.