पोलिसांची कारवाई होताच सराफाने संपविले जीवन, घटनेनं बाजारात खळबळ

येथील जेलरोड जुना सायखेडा रस्त्यावरील लोखंडे मळा येथे राहणारे सराफ व्यावसायिक दीपक कमलाकर दुसाने (२९) यांनी राहत्या घरी गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना शनिवारी (दि.२८) घडली. कल्याण ग्रामीण पोलिसांनी सोमवारी चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी काही सोने दुसाने यांच्याकडून जप्त केले होते. पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे.

नाशिकरोड येथील जुन्या पुलाखाली टपाल कार्यालयासमोर दुसाने नावाचे ज्वेलर्सचे दुकान आहे. यांच्याकडून कल्याण ग्रामीण पोलिसांनी गेल्या सोमवारी चोरीचा माल विकत घेतल्याप्रकरणी काही सोने जप्त केले होते. याप्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसाने यांनी शनिवारी दुपारी 3 वाजेच्या सुमारास राहत्या घरी गळफास घेतला, असे उपनगर पोलिसांनी सांगितले. त्यांनी झालेल्या प्रकाराबाबत मित्र किंवा अन्य व्यापारी यांच्याशी कुठलीही चर्चा याबाबत केली न्हवती. त्यांच्या पश्चात पत्नी,  मुलगा मुलगी असा परिवार आहे. आत्महत्या केल्यानंतर दुसाने यांचे नातेवाईक व मित्र परिवारांनी उपनगर पोलीस ठाण्यात धाव घेऊन कल्याण ग्रामीण पोलिसांच्या जाचाला कंटाळून आत्महत्या केल्याचा आरोप केला. ही घटना ताजी असतानाच शेगाव येथील पोलिसांनी देखील देवी चौकातील एका सराफाकडे चोरीचे सोने विकत घेतल्याप्रकरणी सोने जप्तीसाठी कारवाई केल्याची परिसरात जोरदार चर्चा आहे.

जोपर्यंत कल्याण पोलिसांच्या तपासी पथकावर कारवाई केली जाणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा पवित्रा दुसाने यांच्या नातेवाईकांनी घेतला आहे. उपनगर पोलिसांनी मृतदेह जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केला असून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.