छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश, ‘सत्यशोधक’ राज्य सरकारकडून करमुक्त !

‘सत्यशोधक’ चित्रपटाला करसवलत देण्यात यावी, अशी मागणी आपण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली होती. त्यांनी याबद्दलचा प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत मांडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार प्रस्ताव मांडण्यात आला आणि आज मंत्रिमंडळाने हा निर्णय घेतला. अशी माहिती देत राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी अजित पवार व राज्य शासनाचे आभार मानले.

समता फिल्म्स आणि अभिता फिल्म्सची निर्मिती असलेला हा चित्रपट महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या जीवनपटावर आधारित आहे. प्रसिद्ध अभिनेते संदीप कुलकर्णी यांनी यात महात्मा फुले यांची तर राजश्री देशपांडे यांनी सावित्रीबाईंची भूमिका साकारली आहे. गेल्याच आठवड्यात ५ जानेवारी रोजी हा चित्रपट प्रदर्शित झाला असून नाशिकमध्ये पार पडलेल्या चित्रपटाच्या प्रीमियरला भुजबळ यांनी हजेरी लावली होती. यावेळीच त्यांनी चित्रपट करमुक्त करण्याची घोषणा केली होती. त्यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.

या निर्णयाबद्दल बोलताना त्यांनी या निर्णयामुळे महात्मा फुले यांचे विचार समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहचण्यास मदत होणार आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाईंचे अलौकिक कार्य भावी पिढीपर्यंत पोहचवण्यासाठी हा चित्रपट सहाय्यभूत ठरणार आहे. अशा शब्दांत समाधान व्यक्त करतानाच सर्वांनी ‘सत्यशोधक’ चित्रपट नक्की पहावा, असे आवाहन देखील केले.

Leave A Reply

Your email address will not be published.