Success Story: कॉलेज सोडले आणि उन्हाळ्याच्या सुट्टीत सुरु केली कंपनी; २५ व्या वर्षी बनला ६० हजार कोटींचा मालक
शिक्षण घेताना तुम्ही कितीवेळा उत्तीर्ण झालाय यावर तुमचं करिअर ठरत नसतं. तुमच्याकडे सातत्य, मेहनत घेण्याची तयारी, जिद्द, प्रामाणिकपणा यांचा अंतर्भाव किती आहे, यातून तुमचे करिअर घडत असते. त्यामुळेच शिक्षणात नापास झालेले विद्यार्थी पुढे जाऊन जगासमोर आदर्श ठरले आहेत. अशीच एक कहाणी आपण जाणून घेणार आहोत.
२५ वर्षीय अलेक्झांडर वांग या तरुणाची गोष्ट साऱ्यांनाच प्रेरणा देणारी आहे. त्याने साधारण ६० हजार कोटींची कंपनी स्थापन केली आहे. त्यामुळे फोर्ब्सने जगातील सर्वात तरुण सेल्फ मेड अब्जाधीशांच्या यादीत समावेश केला आहे. अलेक्झांडर वांग हा जगातील सर्वात तरुण स्वनिर्मित अब्जाधीश बनला आहे.
अलेक्झांडरने स्वतःच्या हिमतीवर स्केल एआय ही आर्टिफिशियल इंटेलिजन्स कंपनी तयार केली आहे. अलेक्झांडर वांगने प्रतिष्ठित मॅसॅच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी) मध्ये प्रवेश घेतला होता. पण काही दिवसांतच त्याला अभ्यास सोडावा लागला होता. एमआयटीमधून बाहेर पडला तेव्हा अलेक्झांटरचे वय १९ वर्षे होते.
फोर्ब्स वेबसाइटने दिलेल्या माहितीनुसार, अलेक्झांडर वांग याने २०१६ मध्ये स्टार्टअप स्केल एआयची स्थापना केली. तो त्याचा सीईओ आहे. त्यात अलेक्झांडरची १५ टक्के भागीदारी आहे. हे स्टार्टअप त्यांचा रॉ डेटा एआय आणि मशीन लर्निंगच्या गरजेनुसार इतर कंपन्यांसाठी कस्टमाइज करते. सॅन फ्रान्सिस्कोमध्ये आधारित, ही कंपनी ३०० कंपन्यांना आपली सेवा पुरवते. ही कंपनी सॅटालाइट इमेजचे एनालिसिस करते. ही कंपनी युक्रेन युद्धातही सेवा देत आहे.
वयाच्या १७ व्या वर्षी अलेक्झांडर वांग सिलिकॉन व्हॅलीमध्ये इंजिनीअर म्हणून पूर्णवेळ काम करत होता. तो कोरा ( Quora) प्लॅटफॉर्मवर प्रश्नोत्तरे लिहीत असे. त्याच दरम्यान त्याचे मन मशीन लर्निंगचा अभ्यास सुरु केला. वयाच्या १९ व्या वर्षी त्यांने एमआयटीमध्ये प्रवेश घेतला. पण लवकरच त्याला त्याचाही कंटाळा आला आणि स्केल एआय नावाचा स्टार्टअप सुरू केला.
अलेक्झांडर वांग लॉस अलामोस, न्यू मेक्सिको येथे लहानाचा मोठा झाला. अमेरिकेने दुसऱ्या महायुद्धात अणुबॉम्ब तयार केला ते हे शहर आहे. त्याला स्लीपी टाउन असेही म्हणतात. वांगचे वडील वेपन फिजिक्सचे प्राध्यापक आहेत.