कुस्तीपटूंच आंदोलन म्हणजे दुसरं ‘शाहीन बाग’- बृजभूषण
भारतीय कुस्ती परिषदेचे प्रमुख बृजभूषण शरण सिंह यांच्याविरूद्ध लैंगिक शोषणाचा आरोप करत भारतीय महिला कुस्तीपटू जंतरमंतरवर गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन करत आहेत. आंदोलनकर्त्या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. यावर बृजभूषण सिंग यांनी या आंदोलनाची तुलना शाहीन बाग आंदोलनाशी करत पद सोडण्यास नकार दिला.
विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांच्या नेतृत्वाखाली गेल्या तीन दिवसांपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर बृजभूषण सिंह यांच्याविरूद्ध आंदोलन सुरू केले आहे. आज तिसऱ्या दिवशी या आंदोलनात केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर आणि भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्ष पी.टी. उशा यांनी उडी घेत खेळाडूंशी चर्चा केली.
दरम्यान, या राजकीय घडामोडीनंतर बृजभूषण सिंह हे राजीनामा देणार अशी चर्चा सुरू झाली होती. मात्र बृजभूषण यांनी स्थानिक पत्रकारांना दिलेल्या माहितीनुसार ते राजीनामा देणार नाहीयेत.
टीव्ही चॅनलला दिलेल्या मुलाखतीत बृजभूषण म्हणाले की, ‘आंदोलक खेळाडू हे काँग्रेस आणि दीपिंदर हुड्डा यांचे खेळणे आहेत. अशा प्रकारचे षडयंत्र काँग्रेसने तीन दशकापूर्वी माझ्याबाबतीत केले होते. ते पुन्हा तेच षडयंत्र रचत आहेत.’
बृजभूषण पुढे म्हणाले की, ‘मी यापूर्वीही सांगितले होते की यामागे मोठे शक्तीशाली लोकं आहेत. आता ते चेहरे समोर येत आहेत.’ बृजभूषण यांनी सांगितले की, ‘काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी आणि दीपिंदर हुड्डा यांनी केलेल्या ट्विटवरून सगळे चित्र स्पष्ट होत आहे. हा माझ्यावर हल्ला नाही तर तो भाजपवर हल्ला आहे. स्वतःवरील आरोपांवर आता ब्रुजभूषण यांनी पक्षालाही या प्रकरणात ओढले आहे त्यामुळे येत्या काळात ही लढाई काँग्रेस विरुद्ध भाजपा व्हायची शक्यता नाकारता येत नाही.