स्टॅच्यू ऑफ युनिटी येथे करवीर छत्रपतींचा व भारताच्या गौरवशाली इतिहासाचा अविस्मरणीय ठेवा – खा.संभाजीराजे छत्रपती
सरदार वल्लभभाई पटेल स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकास खा.संभाजीराजे छत्रपती यांची भेट
संसदीय समितीच्या अभ्यास दौऱ्यानिमित्त गुजराज मधील सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या स्मारकास खा.संभाजीराजे छत्रपती यांनी काल भेट दिली.
भारताला स्वातंत्र्यप्राप्ती होत असतानाच सदृढ लोकशाहीसाठी देशातील साडेपाचशेहून अधिक संस्थानांचे विलीनीकरण होणे गरजेचे होते. या महान उद्दिष्टासाठी कित्येक संस्थानिकांनी स्वखुषीने विलीनीकरणाच्या करारावर स्वाक्षऱ्या केल्या. यामध्ये सरदार वल्लभभाई पटेल यांनी सर्व संस्थानिकांना विश्वास देण्यात अग्रगण्य व मोलाची भूमिका बजावली होती असे संभाजीराजेंनी या भेटी संदर्भात बोलताना म्हंटले आहे.
याचीच आठवण म्हणून या स्मारकामध्ये देशातील काही मोजक्याच महत्त्वाच्या संस्थानांचे विलीनीकरणाचे करार प्रदर्शित करण्यात आलेले आहेत. यामध्ये जम्मू काश्मीर, जयपूर, बिकानेर, अलवर यांसह कोल्हापूर राज्याच्या विलीनीकरणाचा करारही प्रामुख्याने प्रदर्शित केलेला आहे. कोल्हापूर राज्याचे तत्कालीन अधिपती, आमचे आजोबा मेजर जनरल श्री शहाजी छत्रपती महाराज यांनी या करारावर स्वाक्षरी केलेली आहे.
‘स्वराज्य’ हे नेहमीच रयतेसाठी होते. कोल्हापूर राज्यात राजर्षि शाहू छत्रपती महाराजांनी लोकशाहीची बीजे पेरत असतानाच आपली रयत त्या लोकशाहीचे निर्वहण करण्यासाठी सशक्त व सुशिक्षित झाले पाहिजेत याचीही काळजी घेतली होती. शाहूपुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी कोल्हापूरच्या राज्यकारभारात रयतेला निम्मे अधिकार बहाल करून कोल्हापूर राज्यात लोकशाहीचा पाया सशक्त केला व मेजर जनरल शहाजी छत्रपती महाराजांनी कोल्हापूर तथा करवीर राज्य स्वतंत्र भारतात विलीन करून आपल्या रयतेला संपूर्ण लोकशाही प्रदान करून, त्यावरती कळस चढविला. याच ऐतिहासिक कराराचे महत्त्व व स्मृती जपण्यासाठी करवीर राज्याच्या विलीनीकरणाचे करारपत्र सरदार पटेल यांच्या स्मारकामध्ये विशेषत्वाने प्रदर्शित केले आहे, हे पाहून अत्यंतिक आनंद झाला असे उद्गार त्यांनी यावेळी काढले.
खा.संभाजीराजे छत्रपती यांच्या समवेत असणाऱ्या सहयोगी खासदारांनाही याबाबत सविस्तर माहिती दिली. त्यांनीही याचे विशेष कौतुक करीत अभिमान व्यक्त केला.