मैत्रिणींनी ८० रुपयांच्या उधारीवर सुरु केली कंपनी, आज कोटींची उलाढाल; लाखो महिलांना दिले बळ
लिज्जत पापडाचा स्वाद आत्तापर्यंत आपल्यापैकी प्रत्येकाने नक्कीच घेतला असेल. पण या पापड कंपन्याच्या यशाची कहाणी आणि इतिहास कमी लोकांनाच माहित असेल. महिला उद्योजकांच्या संघर्षाचे आणि सक्षमीकरणाचे हे एक उत्तम उदाहरण असून स्वतः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी पारंपारिक कामगारांना सशक्त करण्यासाठी लिज्जत पापड व्यवसायाचे उदाहरण दिले. अर्थमंत्र्यांनी सांगितले की, पंतप्रधान विकास योजना देशाच्या ग्रामीण भागात उपस्थित असलेल्या स्वयंसहायता महिला गटांना नवसंजीवनी देईल.
१ फेब्रुवारी रोजी आपल्या अर्थसंकल्पीय भाषणात अर्थमंत्र्यांनी पंतप्रधान विकास (प्रधानमंत्री विश्वकर्मा कौशल सन्मान) योजनेची घोषणा केली. या योजनेंतर्गत कुशल कारागीर आणि पारंपारिक कारागीर यांना अपस्किलिंग, तंत्रज्ञान, क्रेडिट आणि अधिकसाठी सरकारी मदत केली जाईल.
कर्रम, कुर्रम…कुर्रम कर्रम…या पंचलाइनची लिज्जत पापडाची जाहिरात नव्वदीच्या दशकात चांगलीच गाजली होती. लिज्जत पापडाच्या चवीसोबतच त्यांच्या चावीची कहाणीही अतिशय रंजक असून ते महिला सक्षमीकरणाचे उत्तम उदाहरण आहे. सात मैत्रिणी आणि गृहिणींनी सुरू केलेले लिज्जत पापडचे यश आज देशातील अनेक महिलांसाठी मोठी प्रेरणा बनली आहे. आज ही कंपनी भारतभरात ४५ हजारहून अधिक महिलांना रोजगार देत आहे. मुंबईपासून सुरू झालेला लिज्जत पापडचा प्रवास यशस्वी कसा झाला जाणून घ्या.
मुंबईत महिलांच्या एका बचत गटाने ८० रुपये भांडवलातून लिज्जत पापडची सुरुवात केली, पण आज हा एक लोकप्रिय ब्रँड बनला आहे जो त्यांचा दर्जा आणि प्रतिष्ठेसाठी ओळखला जातो. मुंबईत राहणाऱ्या जसवंती जमनादास यांनी १९५९ मध्ये आपल्या ६ मैत्रिणींसोबत पहिल्यांदा लिज्जत पापडची सुरुवात केली. हा तो काळ होता जेव्हा स्त्रियांना व्यवसाय किंवा नोकरीचे फारसे स्वातंत्र्य नव्हते. पण जसवंती जमनादास यांनी हिंमत दाखवली आणि पुढाकार घेत लिज्जत पापडचा पाया घातला. विशेष म्हणजे लिज्जतचा व्यवसाय सुरु करण्यामागचा हेतू पैसे कमावण्याचा नाही तर या सात महिलांना आपल्या कुटुंबाच्या खर्चाला हातभार लावायचा होता.