अबब! आधी नकार देणाऱ्या श्रीकृष्ण मंदिराकडून आता सोन्याची संपत्ती जाहीर; आकडा ऐकून थक्क व्हाल
केरळमधील प्रसिद्ध गुरुवायुर श्रीकृष्ण मंदिराने सोन्याच्या स्वरूपातील संपत्ती अखेर घोषित केली आहे. या देवस्थानाकडे २६० किलोहून अधिक वजनाचे सोने असल्याचे स्पष्ट झाले आहे. माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती प्राप्त झाली आहे.
आमच्या देवस्थानाच्या बँक खात्यात सतराशे कोटी रुपयांच्या ठेवी असल्याची माहिती या मंदिर व्यवस्थापनाने यापूर्वीच दिली होती. मात्र त्यावेळी त्यांनी त्यांच्याकडील सोन्याविषयीचा तपशील देण्यास नकार दिला होता. सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती देऊ शकत नसल्याचे त्यांनी म्हटले होते. परंतु आता त्यांनी ही माहिती उघड केली आहे. आमच्याकडे २६३.६३ किलो सोने असून त्यात मौल्यवान खडे, नाणी आणि सुमारे २० हजार लॉकेटचा समावेश आहे, अशी माहिती देवस्थानातर्फे देण्यात आली.
या देवस्थानाकडे ६,६०५ किलो चांदी व २७१ एकर जागा असल्याचे गेल्या महिन्यात स्पष्ट झाले होते. या जागेचे मूल्य अद्याप निश्चित करण्यात आलेले नाही. हे प्राचीन मंदिर श्री विष्णूचे आहे, परंतु श्रीकृष्ण मानून त्यांची पूजा केली जाते. देशभरातील लाखो भाविक दरवर्षी या मंदिरास भेट देतात.
गुरुवायुर येथील एम. के. हरिदास यांनी माहितीच्या अधिकारांतर्गत ही माहिती मागवली होती. या देवस्थानाचा विकास व येथे येणाऱ्या भाविकांसाठीच्या सुविधा यांच्याप्रती या देवस्थानाचे व्यवस्थापन निष्क्रिय असल्याने ही माहिती मागवली, असे हरिदास यांनी म्हटले आहे.