युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाला हे येणारा काळ ठरवेल … ‘सामना’तून टीका
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) या नुकत्याच मुंबई दौऱ्यावर येऊन गेल्या.या दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar), शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे आणि संजय राऊत या नेत्यांच्या भेटी घेतल्या.
ममत बॅनर्जी यांनी यूपीए कुठे आहे? असा सवाल करत या दौऱ्यात काँग्रेसला डिवचले होते. या विधानाने काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीचा (Third Front) मुद्दा पेटला. काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी ममतांच्या या भूमिकेवर टीका केली मात्र काहींना ही भूमिका आवडली असंही दिसलं. मात्र ‘सामना’च्या अग्रलेखातून शिवसेनेने मांडलेल्या मतामुळे या मुद्द्याला एक वेगळं वळण मिळण्याची चिन्ह आहेत.
“दैवी अधिकारांचा घोळ!” या शिर्षकाखालील अग्रलेखात ममता बॅनर्जींसह राजकिय रणनीतीकार प्रशांत किशोर यांच्या वक्तव्याचा देखील समाचार घेतला आहे.
दैवी अधिकार कुणाला हे वेळ ठरवेल पण सध्या भाजप विरोधात भक्कम पर्याय उभा करा असं आवाहन सर्व विरोधीपक्षांना या अग्रलेखातून करण्यात आले आहे. युपीए नेतृत्वाचा दैवी अधिकार कुणाला आहे हे येणारा काळ ठरवेल असे म्हणत या अग्रलेखातून काँग्रेस शिवाय तिसऱ्या आघाडीच्या मुद्याला शिवसेनेने विरोध केला आहे.
काँग्रेस आज कठीण काळातून जात आहे, मात्र उताराला लागलेली गाडी वर चढूच द्यायची नाही हा प्रयत्न करणे चुकीचे आहे असं मत या अग्रलेखातून मांडण्यात आले आहे. तसेच काँग्रेसच्या जी-२३ नेत्यांचाही यात समाचार घेण्यात आला आहे, ज्या लोकांनी आयुष्यभर काँग्रेसकडून सुख, चैन, सत्ता उपभोगली तेच आता काँग्रेसचा गळा घोटत आहेत असा हल्ला ‘सामना’ तून चढवण्यात आलाय.