नवं सरकार आल्यानं गिरे फॉर्मात… तक्रारीनंतर आंबेगाव तहसिलदारांची थेट अमरावतीत बदली!
कोरोना महामारीमुळे लांबलेल्या तहसीलदारांच्या बदल्यांना अखेर मुहूर्त मिळाला. राज्याच्या महसूल विभागाने मुदत पूर्ण झालेल्या पुणे विभागातील २२ तहसीलदारांच्या बदल्या केल्या. आंबेगावच्या तहसीलदार रमा जोशी यांची थेट अमरावतीत बदली करण्यात आली आहे. शिवसेनेचे नेते आणि आंबेगाव तालुकाप्रमुख अरुण गिरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे जोशी यांच्या कारभाराविरोधात नाराजी व्यक्त केली होती. त्यांना बदलण्याची गळ घातली होती. त्यानुसारच त्यांना अशी पोस्टिंग देण्यात आल्याची तालुक्याच्या वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा आहे.
बदली झालेल्या तहसीलदारांना फक्त पाचच दिवसांत म्हणजे १७ एप्रिलपर्यंत बदलीच्या ठिकाणी रुजू होण्यास सांगण्यात आले आहे. अन्यथा शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला आहे. तर, बदली रद्दसाठी कोणत्याही प्रकारचा दबाव आणल्यास ती गैरवर्तणूक मानून त्याप्रकरणीही सबंधितांविरुद्ध शिस्तभंगाची कारवाई केली जाईल, असे महसूल विभागाने बदली आदेशात म्हटले आहे. तसेच बदली झालेल्या अधिकाऱ्यांची रजाच मंजूर केली जाणार नाही. त्यामुळे बदलीच्या विरोधात त्यांना रजेवरही जाता येणार नाही, याची काळजी घेण्यात आली आहे.