तो परत आलाय! ‘पठाण’नंतर शाहरुख खानचा ‘जवान’ करणार धमाका; सेटवरील खतरनाक लूक व्हायरल

तब्बल चार वर्षांनी तो आला, त्याने पाहिलं आणि त्याने जिंकलं! शाहरुख खानने ‘पठाण’ सिनेमाद्वारे चार वर्षांनी बड्या पडद्यावर कमबॅक केलं आणि सिनेमा सुपरहिट ठरला. दिवसागणिक हा सिनेमा वर्ल्डवाइड ८० ते १०० कोटींची कमाई करत आहे. त्यामुळे २०२३ या वर्षामध्ये शाहरुखची सुरुवात तर भन्नाट झाली आहे. पण यानंतर ‘ये तो सिर्फ ट्रेलर था, पिच्चर अभी बाकी है मेरे दोस्त’ असं म्हटलं तरी चुकीचं ठरणार नाही. शाहरुखचे आणखी दोन मोठ्या बॅनरचे चित्रपट यावर्षी प्रदर्शित होणार आहेत. राजकुमार हिरानी यांचा डंकी सिनेमा डिसेंबर २०२३ मध्ये प्रदर्शित होतोय, तर त्याआधी अॅटली यांचा ‘जवान’ सिनेमा जून २०२३ मध्ये धमाका करेल. दरम्यान पठाणचे यश अनुभवत असतानाच शाहरुख ‘जवान’च्या सेटवर परतला आहे.

तामिळ सिनेमातील आघाडीचे दिग्दर्शक अॅटली यांच्यासोबत शाहरुख ‘जवान’ या सिनेमामध्ये काम करतोय. या सिनेमाचे पहिले पोस्टर काही महिन्यांपूर्वी रीलिज करण्यात आलेले, त्यानंतर चाहते ‘पठाण’बरोबरच ‘जवान’साठी उत्सुक होते. या पोस्टवरुनच दिसतंय याही सिनेमात धमाकेदार अॅक्शन आणि ड्रामा पाहायला मिळेल.

दरम्यान जवानच्या सेटवरील शाहरुख खानचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. किंग खानचा हा लूक चर्चेत आला असून चाहत्यांची उत्सुकता यानंतर आणखी वाढली. व्हायरल फोटोमध्ये शाहरुखने काळ्या रंगाचे कपडे परिधान केले असून, त्याचा चेहरा मळकट अशा बँडेजने अर्धवट झाकलेला आहे. धीरगंभीर असे हावभाव असणारा शाहरुखचा फोटो लक्ष वेधून घेतोय. याशिवाय आणखी एक फोटो ‘जवान’च्या सेटवरुन समोर आला असून त्यामध्ये काही ज्युनिअर आर्टिस्ट दिसतायंत. त्यांच्याही चेहऱ्यावर असेच काहीसे बँडेज आहेत.

दरम्यान पठाण सिनेमाच्या यशाबद्दल बोलायचं झाल्यास २५ जानेवारी रोजी हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि अवघ्या आठवडाभरातच किंग खानची जादू थिएटरमध्ये पाहायला मिळाली. २५० कोटीचे बजेट असणाऱ्या ‘पठाण’ सिनेमाने सातव्या दिवसापर्यंत जगभरात ६३४ कोटींची कमाई केली. पठाणची छप्परफाड कमाई पाहता शाहरुखचे आगामी चित्रपट ‘जवान’ आणि ‘डंकी’ बॉक्स ऑफिसवर काय कमा करतील हे पाहणं महत्त्वाचं ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.