शहाजीबापूंना भुरळ बारामतीच्या कृषिप्रदर्शनाची …
बारामतीमधील कृषि प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांबरोबर शिंदे-फडणविस सरकारमधील मंत्री, आमदारांपासून ते अधिकाऱ्यांपर्यंत सर्वांनाच येथील नवतंत्रज्ञानाच्या अविष्काराची भूरळ पडल्याचे दिसून आले . कृषी मंत्री अब्दुल सत्तार, शिंदेगटाचे सत्ताधारी आमदार शहाजी ( बापू ) पाटील, सुरेंद्र जेवरे यांच्यासह कृषी व पणन विभागासह महसूल आदी खात्यातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांबरोबर कृषिक प्रदर्शनात उपस्थिती लावली.
दरम्यान, आमदार शाहजी(बापू) पाटील म्हणाले, “हे प्रदर्शन शेती उद्योगाची संपूर्ण माहिती देणारे ठरत आहेत. शेतकरी उत्पादक कंपन्यांनी सुरू केलेला प्रक्रिया उद्योग, महिला बचत गटांची विविध उत्पादनांची दालने लक्षवेधी आहेत. साहजिकच शेतकऱ्यांना प्रक्रिया उद्योग सुरू करण्यासाठी प्रेरणा मिळणार आहे, असे शहाजीबापू म्हणाले.
बापू म्हणाले, “माझा सांगोला तालुका तसा दुष्काळी, पण हा डाग पुसून टाकण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करतोय. या कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी मदत करीत आहे.शरद पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली बारामती अँग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या माध्यमातून फळबाग व पालेभाज्या आदी पिके आधुनिक पद्धतीने घेण्यासाठी सांगोला येथील शेतकऱ्यांना मार्गदर्शन करणार आहेत. त्यामुळे कृषिक प्रदर्शनाच्या निमित्ताने बारामती दौरा फायद्याचा ठरला आहे.”