ज्येष्ठ कलावंत शांताबाई काळेंनी सांगितली आपबीती, म्हणाल्या नातेवाईकांनी…
“कोल्हाट्याचं पोर” या पुस्तकाचे लेखक डॉ. किशोर काळे यांच्या मातोश्री शांताबाई काळे यांची घरासाठीची परवड सुरू असताना त्यांनी त्यांच्या परिस्थितीची खरी माहिती सांगितली आहे. “मला रक्तातील नातेवाईकांनी फसवलं, माझं घर काढून घेतलं, वडिलोपार्जित जमीन देखील काढून घेतली”, अशी खंत शांताबाई काळेंनी व्यक्त केली. “माझा मुलगा एमबीबीएस उत्तीर्ण झाला होता. त्याने कुर्डवाडी येथे मोठा दवाखाना उभा केला होता. माझ्या वडिलांची जवळपास ४० एकर पर्यंत शेतजमीन होती. पण माझ्या रक्तातील नात्यांनीच शेतजमीन मला मिळू दिली नाही. माझ्या मुलाने जो दवाखाना उभा केला होता. तो दवाखाना देखील बहिणीने व त्याच्या मुलांनी काढून घेतला. त्यामुळे अशी दयनीय परिस्थिती निर्माण झाली आहे. आज राहायला घर नाही, शेतजमीन नाही”, असं शांताबाई काळे यांनी सांगितलं आहे.
“फेब्रुवारी २००७ मध्ये माझा मुलगा किशोरचा अपघात झाला, अशी माहिती मला अचानक देण्यात आली. सोलापूर शहरातील एका खाजगी रुग्णालयात त्यावर उपचार सुरू होते. मुलाला पाहायला आली असता, त्याला बोलता येत नव्हते. माझ्या मुलाचा अपघात झाला होता की घातपात हे कळतंच नव्हते. उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. मुलाच्या मृत्यूनंतर त्याच कुर्डवाडी येथील दवाखान्याची जमीन मला फसवून काढून घेण्यात आली. माझा देखील घातपात केला जाईल, अशी भीती माझ्या मनात होती. म्हणून मी अलिप्त राहिले आणि अशी परिस्थिती निर्माण झाली” असल्याची माहिती शांताबाई काळे यांनी बोलताना दिली.
शांताबाई काळे यांच्या वडिलांना २५ एकर, १६ एकर अशी शेतजमीन होती. चार बहिणींमध्ये शांताबाई या सर्वात मोठ्या होत्या. वडिलोपार्जित जमिनीवर देखील हक्क मिळाला नसल्याची खंत यावेळी शांताबाईंनी व्यक्त केली. त्याबाबत कोर्टात दावा दाखल केला आहे त्याची सुनावणी देखील सुरू आहे. “महाराष्ट्रभर “कोल्हाट्याचं पोर” या पुस्तकाची प्रसिद्धी झाली होती. एका साहित्यिकाला व त्याच्या पुस्तकाला इतके पुरस्कार मिळाले आहेत. पण माझ्यावर अशी दयनीय जीवन जगण्याची वेळ आली आहे”, असं शांताबाईंनी यावेळी सांगितलं. अनेकदा प्रयत्न करूनही त्या घरापासून आजतागायत वंचित आहेत.