स्वखर्चाने बांबूची शाळा बांधणाऱ्या युवकांना सत्यजित तांबेंची साथ शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र

स्वखर्चाने बांबूची शाळा बांधणाऱ्या युवकांना सत्यजित तांबेंची साथ शिक्षण मंत्र्यांना लिहिले पत्र

अकोला जिल्ह्यातील बार्शीटाकळी तालुक्यातील टिटवा पारधी बेडा येथे साहेबराव राठोड व मंगेश पवार या स्थानिक तरुणांनी पारधी समाजातील विद्यार्थ्यांसाठी स्वखर्चाने ‘अक्षरभूमी’ ही बांबूची शाळा उभारली आहे. या सामाजिक कार्याची दखल महाराष्ट्र राज्य युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी घेतली आहे. या शाळेला पक्की इमारत बांधून देण्यासाठी त्यांनी शासनाला विनंती केली आहे यासाठी त्यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांना पत्र देखील लिहिले आहे.

टिटवा पारधी बेडा येथील विद्यार्थ्यांना सर्वात जवळची प्राथमिक शाळा जुने टिटवा येथे आहे. परंतु ही शाळा सुमारे 3 किमी दूर असल्यामुळे पारधी समाजातील बहुतांश विद्यार्थ्यांना शिक्षणापासून वंचित रहावे लागत होते. यावर उपाय म्हणून साहेबराव राठोड व मंगेश पवार या स्थानिक तरुणानी स्वतः गावातील सभागृहातच शाळा सुरु केली. परंतु तेथे येणाऱ्या अडचणींमुळे ‘अक्षरभूमी’ नावाने विद्यार्थ्यांच्या मदतीने स्वतंत्र एका खोलीची शाळा उभारली आहे. केवळ पारधी समाजातील मुले शिक्षणापासून वंचित राहू नये, या उदात्त हेतूने या सामान्य तरुणांचे हे प्रयत्न सुरु आहेत. ते या शाळेत विनामोबदला अध्यापनही करत आहेत. त्यांची एकच महत्वाची मागणी आहे की, या शाळेसाठी पक्की व कायमस्वरूपी इमारत मिळावी.

निःस्वार्थ भावनेने सुरू असलेली त्यांची ही प्रामाणिक धडपड बघता जिल्हा परिषदेच्या वतीने या गावात शाळेसाठी चांगल्या वर्गखोल्या, फळा य इतर आवश्यक शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यासंदर्भात लवकरात लवकर कार्यवाही करावी अशी विनंती सत्यजित तांबे यांनी शिक्षणमंत्री वर्षाताई गायकवाड, पालकमंत्री बच्चूभाऊ कडू, आ.हरीश पिंपळे, जि.प.अध्यक्षा प्रतिभा भोजने यांना लिहिलेल्या पत्रातून केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.