महाराष्ट्रातील तरुणांना ‘इन्स्पायर’ करण्याचा सत्यजीत तांबेंचा संकल्प
महाराष्ट्रातील तरुणांना ‘इन्स्पायर’ करण्याचा सत्यजीत तांबेंचा संकल्प
संगमनेर | महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे हे युवकांसाठी नेहमी काही ना काही नाविन्यपूर्ण उपक्रम, संकल्पना राबवत असतात. यातून युवा पिढीसाठी काहीतरी उपयुक्त करण्याची त्यांची धडपड दिसत असते. ‘गेट इन्स्पायर्ड’ हा असाच एक प्रेरणादायी उपक्रम त्यांनी सुरू केला आहे. कला, क्रीडा, व्यवसाय, राजकारण, समाजकारण अशा विविध क्षेत्रांत आपल्या कामाचा ठसा उमटविणाऱ्या राज्यातील व देशातील युवक युवतींच्या यशोगाथा या उपक्रमाच्या माध्यमातून जाणून घेतल्या जाणार आहेत. जेणेकरून महाराष्ट्रातील इतर युवक युवतींना त्यातून प्रेरणा मिळेल.
अहमदनगर जिल्ह्यातील राहात्याच्या निखिल सदाफळ या तरुण व्यावसायिकाला ‘गेट इन्स्पायर्ड’ उपक्रमाच्या पहिल्याच भागात झळकण्याचा मान मिळाला आहे. निखिलचे वडील माजी सैनिक असून सध्या शिर्डीच्या साई संस्थानमध्ये सुरक्षा रक्षकाची नोकरी करत आहेत. प्राथमिक शिक्षणापासून ते हॉटेल मॅनेजमेंटपर्यंत संपूर्ण शिक्षण अहमदनगर जिल्ह्यातच झालेल्या निखिलने आपल्या मेहनतीच्या जोरावर अवघ्या तीन वर्षांच्या आतच अमेरिकेत स्वतःचे हॉटेल विकत घेतले आहे व तिथे आज तो एक यशस्वी हॉटेल व्यावसायिक म्हणून कार्यरत आहे. निखिलचा हा संपूर्ण प्रेरणादायी प्रवास सत्यजीत तांबे यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून त्याची मुलाखत घेत जाणून घेतला आहे. निखिलच्या या रंजक प्रवासाची कहाणी सांगणारा हा व्हिडीओ महाराष्ट्रात व्हायरल झाला असून संपूर्ण महाराष्ट्रातील तरुण वर्गाचा उदंड प्रतिसाद मिळत आहे.