सत्यजीत तांबे शिक्षण परिषद घेणार !
पुढील २५ वर्षांच्या शैक्षणिक कृतिकार्यक्रम आखणार
नाशिक पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीची रणधुमाळी सुरू आहे. ज्यांच्या उमेदवारीने संपूर्ण महाराष्ट्र गोंधळला आहे, त्या सत्यजीत तांबे यांनी राजकारणाकडे दुर्लक्ष करून आपला जाहीरनामा सादर केला आहे. यात शिक्षण विभागाला प्राधान्य देत शिक्षकांचे, शिक्षण संस्थांचे व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे ते सांगतात.
विशेष म्हणजे, मूलभूत शिक्षणासह उच्च शिक्षणावर ते या जाहीरनाम्यात भर देत आहेत. पुढील २५ वर्षांसाठी, म्हणजे पुढील किमान ३ पिढ्यांसाठी शिक्षण पद्धतीत सुधारणा व नाव्यिन्य आणण्यासाठी ते काम करणार आहेत. त्यासाठी एप्रिल महिन्यात महाराष्ट्रभरातील शिक्षक, तज्ञ, विविध शिक्षण संस्था, शिक्षण अधिकारी इत्यादींना आमंत्रित करून एका ३ दिवसीय शिक्षण परिषदेचे ते आयोजन करणार आहेत, असे त्यांनी म्हटले आहे.
आपल्या जाहीरनाम्यात ते म्हणतात, “या शिक्षण परिषदेच्या माध्यमातून पुढच्या २५ वर्षांसाठी शिक्षण क्षेत्राला दिशा देण्याचं काम झालं पाहिजे असा हा कृतिकार्यक्रम आखला जाईल.”
स्वतः सत्यजीत तांबे आणि तांबे व थोरात परिवार हे अनेक वर्ष शिक्षण संस्थांच्या माध्यमातून प्राथमिक, माध्यमिक, उच्च, अभियांत्रिक, तसेच वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात कार्यरत आहेत. या शिक्षण परिषदेचे आश्वासन केल्याने खऱ्या अर्थाने सत्यजीत तांबे यांचा शिक्षण क्षेत्रातील प्रशासकीय कामांचा दांडगा अभ्यास, अनुभव व दूरदर्शीपणा दिसून येतो.