पुणे –
संस्कृत भाषेत निर्मित लघुपट पाहण्याची संधी संस्कृतभारती या संस्थेने पुणेकरांना उपलब्ध करुन दिली आहे. रविवार ११ ऑगस्ट २०२४ या दिवशी दुपारी ४ ते ६ या वेळेत स. प. महाविद्यालयातील लेडी रमाबाई हॉलमध्ये हे लघुपट पाहता येतील.
६ वा विश्व संस्कृत-लघुचलचित्रोत्सवः २०२४ अर्थात संस्कृत शॉर्टफिल्म फेस्टीवल चेन्नई यथे पार पडला होता. भारतासह अमेरिका, युएई, ऑस्ट्रेलिया, कझाकीस्तान आदी देशांमधुन आलेल्या ६० हून अधिक लघुपटांनी महोत्सवात सहभागी झाले होते. त्यातील पुरस्कार प्राप्त निवडक लघुपटांचे प्रदर्शन पुण्यात आयोजित करण्यात आले आहे. यामुळे पुर्णतः संस्कृत भाषेत निर्मित लघुपट पाहण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे.
सुप्रसिद्ध सिने कलाकार योगेश सोमण यांच्या हस्ते प्रदर्शनाचे उद्धाटन होणार आहे.
लघुपट प्रदर्शनात प्रवेश मोफत आहे. मात्र जागा मर्यादित असल्याने गुगल फॉर्मद्वारे नोंदणी करणे आवश्यक असल्याची माहिती संस्कृतभारतीच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांत प्रचार प्रमुख सोनाली पंडीत यांनी दिली. गुगल फॉर्मची लिंक संस्कृतभारतीच्या सोशल मिडिया हॅडल्सवर देण्यात आली आहे. संस्कृत भाषेची आवड असलेल्या प्रत्येकाने हा महोत्सव पहावा असे आवाहन पुणे महानगर प्रचार प्रमुख डॉ. धनश्री डोंगरे यांनी केले आहे.