त्यावेळेस माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही… – रोहित आर.आर.पाटील

त्यावेळेस माझ्या बापाची आठवण आल्याशिवाय राहणार नाही… – रोहित आर.आर.पाटील

सांगली | कवठेमहांकाळ नगरपंचायतीच्या निवडणुकीच्या सांगता सभेमध्ये राज्याचे माजी उपमुख्यमंत्री आर आर पाटील यांचे चिरंजीव रोहित पाटील यांनी मतदारांना भावनिक साद घातली.

“या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला जाहीर होईल. त्यावेळेस माझ्या बापाची आठवण तुम्हाला आल्याशिवाय राहणार नाही”, अशी भावनिक साद रोहित पाटील यांनी मतदारांना घातली.

रोहित पाटील म्हणाले की, 15 वर्षे ज्यांच्या हाती सत्ता होती आज तिच लोकं आज आदर्श नगरपंचायत घडवण्यासाठी एकत्र आलो आहोत, असं म्हणत आहेत. मी कवठेमहांकाळचा सगळा परिसर पिंजून काढला आहे. विस्तारित भाग आणि तिथली परिस्थिती काय आहे हे मला माहीत आहे. विकासाच्या मुद्द्यावर ज्यांना निवडणूक लढवायची आहे, जी लोकं मला सल्ले देण्याचे काम करत आहेत त्यांनी या शहरात काय विकास कामे प्रलंबित आहेत, हे माझ्या पुढे येऊन सांगावं,’ असं आव्हान रोहित पाटील यांनी विरोधकांना दिले.

‘आमच्या मनातील पॅनेल निवडलंय’, असं आमच्या पॅनेलबाबत सर्वसामान्यांचे मत आहे. सर्वसामान्य माणसाने राष्ट्रवादीला खांद्यावर घेतलंय. सर्वसामान्यांनी पक्षाची जबाबदारी घेतली आहे. या निवडणुकीचा निकाल 19 जानेवारीला लागणार आहे. निकाल लागल्यानंतर माझ्या बापाची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही”, असं म्हणत रोहित यांनी मतदारांच्या मनात हात घालण्याचा प्रयत्न केला.

कवठेमहांकाळ नगरपंचायत निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचे युवा नेते रोहित आर आर पाटील विरोधात महाविकास आघाडी असं चित्र आहे. कवठेमहांकाळमधील राष्ट्रवादीकडील सगळे गट महाविकास आघाडीकडे गेले आहेत. खासदार संजय काका पाटील (भाजप), घोरपडे (शिवसेना), सगरे गट (राष्ट्रवादी) आणि गजानन कोठावळे गट असे सर्व जण एकत्र येऊन महाविकास आघाडी निर्माण केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.