नशेसाठी केवळ दिवसा घरफोडी करणाऱ्या अट्टल घरफोड्यास गुन्हे शाखेने पकडले; ३ महिन्यांत एकट्या विरारमध्ये केल्या १४ घरफोड्या 

विरार भागात दिवसाच्या घरफोड्या करून धुमाकूळ घालणाऱ्या अट्टल घरफोड्यास पोलिसांच्या गुन्हे शाखेने बेड्या ठोकल्या आहेत . ऑक्टोबर मध्ये जेल मधून सुटल्या नंतर ह्या नशेडी घरफोड्याने तीन महिन्यात तब्बल १४ घरफोड्या विरार भागात केल्या .

मीरा भाईंदर – वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेचे उपायुक्त अविनाश अंबुरे यांनी शनिवारी मीरारोड येथे पत्रकार परिषद घेऊन अट्टल घरफोड्या अक्रम फारुक अन्सारी ( वय २४ वर्षे ) सध्या रा. रूम नं. ६, दिवा – नगर चाळ, वाघोबा मंदीराचे समोर, रायपाडा, विरार पुर्व,  जि. पालघर ह्याच्या कारनाम्यांची माहिती दिली .

२१ जानेवारी रोजी विरारच्या फुलपाडा , विकास नगरी येथील श्री साई गणेश इमारतीत राहणाऱ्या रुक्मिणी गोवेकर व प्रवीण पांगम यांची दिवस घरे फोडून मुद्देमाल चोरण्यात आला होता . त्या गुन्ह्याचा तपास देखील गुन्हे शाखे कडे वर्ग करण्यात आला होता .

गेल्या काही महिन्यात घरफोड्यांचे वाढते प्रमाण पाहून उपायुक्त अंबुरे व सहायक आयुक्त अमोल मांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख, उपनिरीक्षक उमेश भागवत सह  शंकर शिंदे, अशोक पाटील, सचिन घेरे, सागर बारावकर, मनोज सकपाळ, अश्विन पाटील,  सुमित जाधव,  प्रविण वानखेडे, सागर सोनवणे, संतोष चव्हाण यांच्या पथकाने घरफोड्यांचा तपास सुरु केला .

गुन्हे शाखेच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण , सीसीटीव्ही पडताळणी  व खबऱ्यांच्या माध्यमातून २३ जानेवारी रोजी अक्रम ह्याला विरारच्या भाटपाडा भागातून अटक केली . तपासात त्याने नोव्हेम्बर ते जानेवारी दरम्यान एकट्या विरार भागात घरफोडीचे १४ गुन्हे केल्याचे उघडकीस आले . पोलिसांनी त्याच्या कडून गुन्हयात वापरलेले वाहन, सोन्या – चांदीचे दागीने, मोबाईल असा २ लाख ९० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे अशी माहिती उपायुक्त अंबुरे यांनी दिली .

विरार भागात राहणारा अक्रम हा नशेडी असून त्याला अमली पदार्थांचे व्यसन आहे . लग्न होऊन देखील कामधंदा न करता व्यसनाच्या आहारी गेलेल्या अक्रम ह्याने घरफोड्यांचा सपाटा लावला . विरार भागातच तो मुख्यत्वे घरफोड्या करत असे . ह्या आधी त्याच्यावर विरार – वसई भागात घरफोड्यांचे १० गुन्हे दाखल आहेत . गेली तीन वर्ष तो गुन्ह्यात ठाणे कारागृहात शिक्षा भोगत होता . ऑक्टोबर २०२२ मध्ये कारागृहातून सुटून आल्या नंतर त्याने पुन्हा विरार भागात घरफोड्यांचा सपाटा लावला होता .

अक्रम हा केवळ दिवसाच्या वेळीच घरफोडी करायचा . रखवालदार व सीसीटीव्ही नाही हे पहायचा . घराला टाळे मारलेले असेल वा पळत ठेऊन कुठल्या वेळात घरी कोणी नसते हे साधून घराचे कांडीकोयंडे तोडत असे . अक्रम सध्या विरार पोलिसांच्या कोठडीत आहे .

Leave A Reply

Your email address will not be published.