१४ नंबर येथील अनंत ग्रामीण पतसंस्थेवर सशस्त्र दरोडा. व्यवस्थापकावर झाडली बंदुकीची गोळी

नारायणगाव | जुन्नर तालुक्यातील कांदळी गावामध्ये भरदिवसा सशस्त्र दरोडा पडला आहे. भरदुपारी झालेल्या या घटनेने ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे.

नारायणगाव पोलीस स्टेशन हद्दीतील १४ नंबर कांदळी गाव येथील पुणे नाशिक महामार्गालगत असलेल्या अनंत ग्रामीण सहकारी पतसंस्था येथे आज दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास दोन अज्ञात इसमांनी पतसंस्थेमध्ये येऊन व्यवस्थापकांवर गोळीबार करत जवळपास दोन ते अडीच लाख रु. लुटले.

यातील एका इसमाने लालसर शर्ट घातलेला व दुसऱ्याने निळा रंगाचा शर्ट घातला होता. दोघांच्याही डोक्यात हेल्मेट तसेच काळ्या रंगाची मोटारसायकलवर शस्त्र बाळगलेले होते. पतसंस्थेचे मॅनेजर राजेंद्र दशरथ भोर (वय – ५२) यांचेवर फायरींग करून पतसंस्थेतील दोन ते अडीच लाख रुपये रोख रक्कम घेऊन काळ्या रंगाच्या मोटारसायकलवर आळेफाटा रोडने निघून गेले. अशी माहिती नारायणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक विलास देशपांडे यांनी दिली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फुटेज पोलिसांच्या हाती लागले असून पुढील तपास सुरू आहे. पुणे ग्रामीण मधील सर्व पोलीस ठाणे यांनी आपापल्या हद्दीत नाकाबंदी करून आरोपीचा शोध घ्यावा असे आवाहन देशपांडे यांनी केले आहे. याघटनेमुळे परिसरातील नागरिक भयभीत झाले आहेत.

 

Leave A Reply

Your email address will not be published.