पिस्तुलाचा धाक दाखवून दरोडेखोरांनी व्यावसायिकाला लुटले जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथील घटना, घटना सीसीटीव्हीमध्ये कैद
आळेफाटा | पिस्तुलाचा धाक दाखवून चार दरोडेखोरांनी एका दुकानातील रोख रक्कम चोरून नेली असल्याची घटना जुन्नर तालुक्यातील आळेफाटा येथे घडली. सोमवारी (दि.७) रात्री साडे दहा वाजता हि घटना घडली आहे.
अविनाश पटाडे यांच्या साई इलेक्ट्रॉनिक्स या दुकानात हि घटना घडली आहे. पटाडे हे बोरी बु. येथे राहतात. सोमवारी रात्री साडे दहा वाजण्याच्या सुमारास चार अज्ञात दरोडेखोरांनी प्रवेश केला आणि बंदुकीचा धाक दाखवून दुकानातील १८ हजार रुपये व मोबाईल चोरून नेले अशी माहिती आळेफाटा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मधुकर पवार यांनी दिली.
ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर जुन्नरचे उपविभागीय पोलिस अधिकारी मंदार जावळे व पोलिस निरिक्षक मधुकर पवार यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. या घटनेचा पुढील तपास सुरु आहे .
नुकत्याच काही दिवसांपूर्वीच चौदानंबर येथील अनंत पतसंस्थेवर भर दुपारी दरोडा पडला होता. या घटनेमध्ये पतसंस्थेचे व्यवस्थापक राजेंद्र भोर यांचा गोळी लागून मृत्यू झाला होता याही घटनेचा तपास अद्याप सुरूच आहे.
ही घटना ताजी असतानाच आळेफाटा येथे पुन्हा बंदुकीचा धाक दाखवून दरोडा पडल्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये व व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. जुन्नर तालुक्यात वारंवार अशा घडत असल्यामुळे तालुक्यात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.