आमदार दिलीप मोहिते पाटलांचा मंत्रिपदासाठी विचार करावा – खा.अमोल कोल्हे
राजगुरूनगर | राष्ट्रवादी काँग्रेसची राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या निमित्ताने खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाची आढावा बैठक प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत शनिवारी (दि २६) पार पडली. यावेळी पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लि. च्या संचालकपदी बिनविरोध निवड झाल्याबद्दल दिलीप मोहिते पाटील यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वात आज पाचव्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पुणे जिल्ह्यातील खेड विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
यावेळी ना. जयंत पाटील म्हणाले, २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पुणे जिल्ह्याने उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेसला सर्वात जास्त आमदार दिले. मागील लोकसभा व विधानसभा निवडणुका खेड तालुक्यातील संघटनेने मोठ्या ताकदीने लढविल्या आणि विजय मिळवला. इथल्या पक्ष संघटनेची ताकद मी जाणून आहे, असे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी सांगितले. शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्ताने लोकांना जागृत केल्याने आज आपण सत्तेत आहोत, याचे स्मरण पाटील यांनी कार्यकर्त्यांना करून दिले. खासदार डॉ. अमोल कोल्हे कार्यकर्त्यांना संबोधित करताना म्हणाले, सत्ता आल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधणे हे सर्व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना सुखावणारा क्षण आहे. निवडणुकीच्या काळात बैलगाडा शर्यत सुरू झाल्यानंतर पहिल्या बारी समोर घोडी धरण्याचा दिलेला शब्द मी याच खेड तालुक्यात पाळला, याचा आवर्जून उल्लेख खा. डॉ. अमोल कोल्हे यांनी यावेळी केला. डॉ. कोल्हे यांनी आपल्या भाषणात आ. दिलीप मोहिते पाटील यांचा मंत्रीपदासाठी विचार करावा, अशी विनंती प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे केली. खेड-आळंदीच्या मतदारांनी लोकसभा निवडणुकीवेळी मला चांगलं मताधिक्य दिलं होतं असे डॉ.कोल्हे यावेळी बोलताना म्हणाले. खा.कोल्हे यांनी खासदार निधीतून सुरू असलेल्या विकास कामांची माहिती उपस्थितांना दिली.
यावेळी खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघाचे आमदार दिलीप मोहिते पाटील, पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष निर्मला पानसरे, भोसरीचे प्रथम आमदार विलासराव लांडे, खेड तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष कैलास सांडभोर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे अध्यक्ष कैलास लिंभोरे, खेड तालुका महिला अध्यक्षा संध्या जाधव, युवती अध्यक्षा आशा तांबे, चाकण शहर अध्यक्ष राम गोरे, राष्ट्रवादीचे पदाधिकारी, कार्यकर्ते व खेड तालुक्यातील नागरिक उपस्थित होते.