करवीरचं आणि जुन्नरचं नातं अतूट; नारायणगावकरांनी केलेला सन्मान हा छत्रपती घराण्याचा सन्मान – खा.संभाजीराजे छत्रपती
खा. संभाजीराजेंनी केले नारायणगावकरांचे मनभरून कौतुक
नारायणगाव | उत्तर पुणे जिल्ह्यातील सर्वात मोठी बाजारपेठ असलेल्या नारायणगाव नगरीच्या पूर्व वेशीचा जीर्णोद्धार नुकताच सरपंच योगेश पाटे यांच्या नेतृत्वाखाली ग्रामस्थांच्या सहकार्याने करण्यात आला. या वेशीचे नामकरण ‘राजा शिवछत्रपती महाद्वार’ असे करण्यात आले. या वेशीचा लोकार्पण समारंभ मोठ्या दिमाखात बुधवारी (दि.०५) संपन्न झाला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा.संभाजीराजे छत्रपती हे उपस्थित होते. त्यांच्या समवेत सह्याद्री प्रतिष्ठान चे अध्यक्ष श्रमिक गोजमगुंडे, सुरगाणा संस्थानचे अतिशराजे पवार आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
नारायणगावकरांनी केलेला सन्मान हा संभाजीराजेंचा नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याचा सन्मान केला आहे. जुन्नरचं आणि महाराष्ट्राचं, देशाचं आणि जगाचं नातं आहेच कारण इथं शिवाजी महाराजांचा जन्म झाला. परंतु करवीर आणि जुन्नर मध्ये साम्य आहे ते म्हणजे ज्याठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या वास्तूचा जीर्णोद्धार करवीर छत्रपती राजाराम महाराजांनी केला होता. त्यामुळे जेवढा आमचा तुमच्यावर अधिकार आहे तेवढाच तुमचा आमच्यावर अधिकार आहे. सिंहासनावर रुढ झालेले छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हा रायगडावरील पुतळा आणि छत्रपती राजाराम महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्यावर बसवलेला महाराजांचा पुतळा, कोल्हापूर मधील भवानी मंडपामधील छत्रपती संभाजी महाराजांच्या आणि नारायणगावच्या वेशीवरील पुतळा यामधील महाराजांच्या बैठकीत साम्य आहे असं खा.संभाजीराजे छत्रपती याप्रसंगी बोलताना म्हणाले.
राज्यातील 300 पेक्षा जास्त किल्ले म्हणजे (fort)(छत्रपती शिवाजी महाराजांची जिवंत स्मारके आहेत. या किल्ल्यांचे संवर्धन करून या वास्तू जतन करण्यासाठी फोर्ट फेडरेशनची (fort federation) स्थापना करण्यात येणार आहे. या माध्यमातून निवडक 50 किल्ले शास्त्रोक्त पद्धतीने संवर्धन करण्याचा निर्णय घेतला आहे. या फोर्ट फाऊंडेशन मध्ये राज्यातील सर्व गड संवर्धन करणाऱ्या संघटनांना सहभागी करून घेणार आहे. यासंदर्भात मी काही मोठ्या उद्योजकांशीही बोललो आहे. परंतु फक्त पैसे असून उपयोग नाही या कामासाठी तन मन धनाने काम करणारी माणसं पाहिजे असं संभाजी राजे यावेळी म्हणाले.
नारायणगावच्या वेशीच्या कामाचे लोकार्पण करताना खा.संभाजीराजेंनी सरपंच योगेश पाटे आणि जनसेवा मंडळाच्या सर्व सहकाऱ्यांचे मनभरून कौतुक केले. किल्यांच्या संवर्धनाच्या कामात या मावळ्यांना सहभागी करून घेतले जाईल व रायगड येथील प्रवेशद्वार उभारणीवेळी पहिली वीट रचण्याचा मान नारायणगावकरांना दिला जाईल. याकामी तुमच्या सर्वांचे मार्गदर्शन घेऊ असे कौतुकास्पद उद्गार संभाजीराजेंनी यावेळी काढले.
यावेळी आमदार महेश लांडगे, आमदार अतुल बेनके, माजी आमदार शरद सोनवणे, विघ्नहर साखर कारखान्याचे अध्यक्ष सत्यशिल शेरकर, अक्षय आढळराव पाटील, माजी सभापती शिवाजीराव खैरे, जि. प.सदस्य आशाताई बुचके यांसह विविध गावचे सरपंच, सदस्य आदी मान्यवर उपस्थित होते.