अनिल देशमुखांच्या समर्थनार्थ काटोल तालुक्यातील जनता उतरली रस्त्यावर
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीने अटक केली व त्यांचे चिरंजीव हृषीकेश यांना ईडीने नोटीस बजावली आहे. देशमुखांवर आरोप करणारे परमबीर सिंह हे मात्र बेपत्ता आहेत. त्याचप्रमाणे माझ्याकडे यापेक्षा जास्त पुरावे नाहीत अशीही त्यांनी उत्तरे पाठवले आहेत. तरीही ईडीची देशमुख कुटुंबीयांच्या विरोधात दिवसाआड काही ना काही कारवाई चालू आहे. देशमुख यांना जाणूनबुजून त्रास देण्यात येत आहे असे काटोल तालुक्यातील देशमुख समर्थकांना वाटत आहे. त्यामुळे याचा निषेध म्हणून काटोल या मतदारसंघातील 18 गावांत लोकांनी रास्ता रोको करून देशमुखांना समर्थन दिले आहे.
परमबीर सिंह यांनी राज्य सरकारने स्थापन केलेल्या आयोगासमोर स्पष्टीकरण दिले, की माझ्याकडे पत्राशिवाय इतर कोणतेही पुरावे नाहीत. दुसरीकडे मात्र उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयामध्ये ईडी कडून अनिल देशमुख हे संशयित आहेत, म्हणून त्यांची चौकशी करायची आहे असं सांगण्यात येत आहे.
या संस्थांवर केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारचा दबाव आहे का?,असा प्रश्न अधोरेखित होतो. देशमुख कुटुंबीयांची चौकशी करीत असताना त्यांच्या घरावर धाड टाकतात. तक्रारकर्ते परमबीर सिंह यांची मात्र अजूनही चौकशी करण्यात आली नाही. केंद्रातील भाजप सरकार हे परमबीर सिंह यांना हाताशी धरून देशमुख कुटुंबीयांविरुद्ध विरुद्ध कटकारस्थान रचत आहे का असाही प्रश्न उपस्थित होत आहे. खोट्या आरोपांत अनिल देशमुख यांना केंद्रीय संस्था फसवत आहेत का? केंद्रीय तपास यंत्रणा त्यांच्या कुटुंबीयांना त्रास देत असल्याने काटोल विधानसभा क्षेत्रात आज जवळपास १८ ठिकाणी रस्ता रोको आंदोलन करण्यात आले. काटोल-नरखेड मतदार संघाच्या अनेक गावातील नागरिक आपापल्या पद्धतीने आंदोलन करून अनिल देशमुख यांच्या अटकेचा निषेध करीत आहे.
केंद्रीय तपास यंत्रणा ज्या पद्धतीने भाजप सोडून इतर पक्षांतील नेत्यांवर कारवाया करीत आहे, त्यावरून यंत्रणा भाजपच्या दबावाखाली आहे, असे जनतेत बोलले जात आहे. भाजप नेत्यांच्या विरोधात बोलणाऱ्यांवरच ईडीचे हत्यार उपसले जात आहे. केंद्र सरकारचे हे राजकारण आमच्या लक्षात येत आहे. पोटनिवडणुकीत जनतेने प्रचंड महागाईचे उत्तर भाजपला दिलेच आहे. यापुढेही असेच सुरू राहिले, तर आगामी निवडणुकीतही भाजपला त्यांची जागा दाखवून देऊ, असा इशारा काटोलमधील आंदोलक प्रतिनिधींनी दिला आहे.