पिक्चर अभी बाकी है! राहुल गांधी पुन्हा ‘भारत जोडो यात्रा’ काढणार, दुसरा टप्पा सुरू करणार
काँग्रेस नेते राहुल गांधी यांची ‘भारत जोडो यात्रा’ आज जम्मू-काश्मीरमध्ये संपत आहे. या यात्रेत राहुल गांधींनी १२ जाहीर सभा, १०० हून अधिक पथ सभा आणि १३ पत्रकार परिषदांना संबोधित केलं. सुमारे पाच महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या या प्रवासांतर्गत राहुल गांधींनी सुमारे ४ हजार किलोमीटरचा प्रवास केला. काँग्रेसचे सरचिटणीस आणि राज्यसभा खासदार केसी वेणुगोपाल यांनी आता यात्रेसंदर्भात मोठी घोषणा केली आहे. वेणुगोपाल म्हणाले की, राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पुन्हा एकदा भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा यावर्षी आयोजित करणार आहे.
काँग्रेस नेते वेणुगोपाल यांनी भारत जोडो यात्रेत महत्त्वाची भूमिका बजावली आहे. जवळपास संपूर्ण प्रवासात ते राहुल गांधींसोबत होते. “पक्षाचे आता ‘हाथ से हाथ जोडो अभियान’ सुरू झाले आहे. ही मोहीम तीन महिने चालणार आहे. या मोहिमेत पक्षाचे नेते व कार्यकर्ते यात्रेच्या यशाचा संदेश आणि देशातील राजकीय परिस्थिती घरोघरी पोहोचवणार आहेत. या मोहिमेनंतर भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा नक्कीच असेल”, असं वेणुगोपाल यांनी म्हटलं आहे. ते ‘इंडियन एक्स्प्रेस’ वृत्तसमूहाला दिलेल्या मुलाखतीत बोलत होते.
वेणुगोपाल म्हणाले की, भारत जोडो यात्रेचा दुसरा टप्पा कसा आयोजित करायचा हे आता आम्ही ठरवू. पक्षाकडून अद्याप अंतिम आराखडा आलेला नाही, मात्र दुसरा टप्पा नक्कीच असेल, ज्यामध्ये राहुल गांधी यांचा सहभाग असेल. पक्षात अनेकांचं मत जाणून घेतलं जात आहे आणि काँग्रेस वर्षभर मैदानात राहणार आहे.
भारत जोडो यात्रेच्या समारोपाच्या निमित्ताने काँग्रेसने आज जम्मू-काश्मीरच्या श्रीनगरमध्ये जोरदार बर्फवृष्टीदरम्यान रॅली काढली. शेर-ए-काश्मीर क्रिकेट स्टेडियमपासून निघालेल्या रॅलीचे नेतृत्व काँग्रेस नेते राहुल गांधी, प्रियांका गांधी आणि पक्षाचे प्रमुख मल्लिकार्जुन खरगे यांनी केले. यात द्रविड मुन्नेत्र कळघम (द्रविड), नॅशनल कॉन्फरन्स (NC), पीपल्स डेमोक्रॅटिक पार्टी (PDP), कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (CPI), रिव्होल्युशनरी सोशालिस्ट पार्टी (RSP) आणि इंडियन युनियन मुस्लिम लीग (IUML) चे प्रतिनिधी देखील उपस्थित होते.