पुणे जिल्ह्यातील दोन्ही बैलगाडा शर्यतींना स्थगिती, प्रशासनाने परवानगी नाकारली
पुणे जिल्ह्यातील दोन्ही बैलगाडा शर्यतींना स्थगिती, प्रशासनाने परवानगी नाकारली
पुणे | सर्वोच्च न्यायालयाने ( Supreme Court ) सशर्त परवानगी दिल्यानंतर पुण्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यात बैलगाडा शर्यतीचं ( Bullock Cart Race ) आयोजन करण्यात आलं होतं. मात्र राज्यात कोरोनाचा प्रार्दुभाव (Corona) पुन्हा एकदा वाढत चालला आहे या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी या शर्यतींना परवानगी नाकारली आहे.
या दोन्ही स्पर्धा आज होणार होत्या. मात्र या स्पर्धांना पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली आहे. कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.
राज्यातील प्रमुख शहरांमध्ये कोरोना रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. राज्यात काल 8 हजारापेक्षा अधिक नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. पुणे शहरात 412 नवे रुग्ण सापडले आहेत. पुण्यात सध्या 1 हजार 799 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी बैलगाडा शर्यत तात्पुरती स्थगित करण्याचा महत्वाचा निर्णय घेतला आहे.
नववर्षाच्या पहिल्याच दिवशी बैलगाडा शर्यत होणार होती. आंबेगावमधील लांडेवाडीत दरवर्षी शितळादेवीची यात्रा भरते, या यात्रेनिमित्ताने बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आलं होतं. तर दुसरीकडे मावळ तालुक्यातील नाणोली तर्फे चाकण गावातील दत्तजयंती उत्सवानिमित्ताने बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी मिळाली होती. 7 ते 8 वर्षानंतर गावातील बैलगाडा शर्यत होणार होती त्यामुळे बैलगाडा मालकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बैलगाडा शर्यत तात्पुरती स्थगित करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ आणि आंबेगाव तालुक्यातील बैलगाडा शर्यतींची घोषणा करण्यात आली होती. शिवसेनेचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी या स्पर्धांचं आयोजन केलं होतं. मात्र, आता ही स्पर्धा तात्पुरती स्थगित करण्यात आली आहे.