संसदेतील प्रेस गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेश द्या या मागणीसाठी उद्या पत्रकारांचा दिल्लीत मोर्चा

संसदेतील प्रेस गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेश द्या या मागणीसाठी उद्या पत्रकारांचा दिल्लीत मोर्चा

नवी दिल्ली | लोकसभा, राज्यसभा आणि सेंट्रल हॉल मधील प्रेस गॅलरीमध्ये पत्रकारांना प्रवेश द्या या मागणीसाठी उद्या पत्रकार मोर्चा काढणार आहेत.
संसदेत सरकारने पत्रकारांवर घातलेल्या बंदीमुळे आता थेट पत्रकारांवरच मोर्चा काढण्याची वेळ आली आहे. कोव्हिडचा काळ सुरु झाल्यानंतर 2020 च्या सुरुवातीपासून पत्रकारासांठी प्रेस गॅलरी बंद करण्यात आली आहे.

पण आता सार्वजनिक ठिकाणे निर्बंधमुक्त झालेली असताना प्रेस गॅलरी मात्र अजूनही बंदच ठेवण्यात आली आहे. पत्रकारांना लोकसभा, राज्यसभा तसेच संसदेच्या सेंट्रल हॉल गॅलरीमध्ये जाण्यासही सक्त मनाई आहे.

या संदर्भात प्रेस क्लब ऑफ इंडियानं निषेधाचं पत्र जाहीर केले आहे. उद्या दुपारी सर्व ज्येष्ठ पत्रकार मोर्चा काढून याबाबत आपला निषेध व्यक्त करणार आहेत. संसदेत प्रवेश नाही पण संसद आवारात देखील सध्या लॉटरी पद्धतीनं माध्यमांना प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे संसद आवारात जाण्यास आठवड्यातून दोनच दिवस एखाद्या संस्थेच्या पत्रकाराला संधी मिळत आहे.

याबाबत विरोधी पक्षांनीही सरकारला निवेदनं दिली आहेत. पण अद्यापही पत्रकारांना परवानगी मिळालेली नाही. काही काळासाठी आम्ही निर्बंध समजू शकतो, पण कोविडचं कारण पुढं करुन तुम्ही सगळ्याच प्रथा परंपरा मोडीत काढायला निघाला आहात का? अशी शंका येते अशी प्रतिक्रिया प्रेस क्लब ऑफ इंडियाचे अध्यक्ष उमाकांत लखेरा यांनी दिली आहे. त्यामुळे आता पत्रकारांच्या मोर्चानंतर तरी सरकार याबाबत काही पावलं उचलते का हे पाहावं लागेल.

Leave A Reply

Your email address will not be published.