मुंबै बँक | आ.प्रवीण दरेकर ‘अपात्र’! सहकार विभागाची कारवाई
मुंबई : नुकत्याच झालेल्या निवडणुकीत मुंबई जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवर संचालक म्हणून बिनविरोध निवडून गेलेले विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांना मजूर म्हणून सहकार विभागाने अपात्र ठरविले आहे. मुंबै बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. असे असताना दरेकर यांना सहकार विभागाकडून अपात्र घोषित करण्यात आले आहे. १९९७ पासून मुंबै बँकेवर ‘मजूर’ प्रवर्गातून संचालक म्हणून दरेकर निवडून जात होते. अपात्रतेच्या कारवाई नंतर दरेकर यांनी मजूर नसतानाही निवडणूक लढवून शासनाची फसवणूक केली आहे हे या निमित्ताने उघड झाले आहे.
निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रातील कोट्यवधींची मालमत्ता तसेच व्यावसायिक म्हणून केलेली नोंद आणि आमदार म्हणून अडीच लाख रुपये मानधन मिळविणारी व्यक्ती मजूर असूच शकत नाही हे या आदेशामुळे स्पष्ट झाले आहे. नुकत्याच झालेल्या मुंबै बँकेच्या निवडणुकीत सहकार पॅनेलचा विजय झाला असताना दुसरीकडे प्रवीण दरेकर यांना सहकार विभागाने मजूर म्हणून अपात्र घोषित केले आहे. गेली अनेक वर्षे आमदार असतानाही मजूर असल्याचे भासवून मुंबै बँकेत संचालक म्हणून निवडणूक लढवत होते. ही बँकेची तसेच हजारो ठेवीदारांची फसवणूक असून याप्रकरणी आपण पोलीस ठाण्यात फसवणूकीचा गुन्हा दाखल करणार असल्याचे आपचे राज्य सचिव धनंजय शिंदे यांनी सांगितले.
दरम्यान या बद्दल अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनीही सहकार विभागाच्या आदेशाचा अभ्यास करून आपण कायदेशीर कारवाईसाठी संबंधित ठिकाणी पत्र देऊन मुंबै बँकेतील घोटाळय़ांचा पर्दाफाश करणार असल्याचे सांगितले. सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दरेकर यांना मजूर म्हणून आपल्याला अपात्र का घोषित करू नये, याबाबत सहकार विभागाने नोटीस जारी केली. म्हणणे मांडण्यासाठी ३१ डिसेंबर ही मुदत दिली होती. मात्र तोपर्यंत दरेकर यांच्यावतीने म्हणणे सादर करण्यात आले नाही. अखेर सोमवारी विभागीय सहनिबंधक बाजीराव शिंदे यांनी दरेकर यांना अपात्र केल्याचा आदेश जारी केला.