शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे किल्ले शिवनेरीवर अनावरण
शिवजयंतीनिमित्त ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे महाराष्ट्राचे उप-मुख्यमंत्री यांच्या शुभहस्ते व इतर मंत्री महोदय – मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत किल्ले शिवनेरीवर अनावरण, जुन्नरचा वारसा जगभरात
पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग; आणि उपविभागीय अधिकारी कार्यालय, जुन्नर-आंबेगाव (उपविभाग मंचर) यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १९ फेब्रूवारी २०२२, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त किल्ले शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे सन्माननीय उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्राचे सन्माननीय गृहमंत्री दिलीप वळसे पाटील; महसूलमंत्री बाळासाहेब थोरात; पर्यटन व राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे; पर्यावरण राज्यमंत्री आदिती तटकरे; पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्रच्या मधुमिता दास, स्थानिक आमदार अतुल बेनके; बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण शास्त्रज्ञ डॉ. सचिन पुणेकर; विभागीय आयुक्त, पुणे विभागाचे सौरभ राव, पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, जुन्नर-आंबेगावचे (उपविभाग मंचर) उप विभागीय अधिकारी सारंग कोडलकर; मराठा सेवा संघाचे अध्यक्ष विजय घोगरे; इतर सन्माननीय शासकीय अधिकारी व शिवप्रेमी – पर्यावरणप्रेमी यांच्या उपस्थितीत करण्यात आले.
शिवनेरीवर ‘जुन्नरची रत्ने’ या १५ सचित्र पोस्ट कार्ड संचाची पहिली प्रत पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्राच्या श्रीमती दास यांनी उप-मुख्यमंत्री आणि पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांना सुपूर्त केली. सदर सचित्र पोस्टकार्ड संचाचे प्रस्तावक आणि संकल्पना डॉ. सचिन पुणेकर यांची आहे. सदर विशेष आवरणाच्या प्रस्तावाला पोस्टमास्टर जनरल, पुणे क्षेत्र, पुणे, भारतीय डाक विभाग यांची अधिकृत मान्यता देखील मिळाली आहे. सदर सचित्र पोस्ट कार्ड संचाच्या माध्यमातून जुन्नर तालुका आणि परिसरातील ऐतिहासिक, भौगोलिक, पर्यावरणीय आणि अध्यात्मिक वारसा अधोरेखित केला आहे. परिसरातील हा समृद्ध वारसा जनमानसात रुजावा, त्याचे जतन, संवर्धन व्हावे आणि शाश्वत पर्यटन क्षेत्राला चालना मिळावी आणि परिणामी स्थानिक लोकांची या माध्यमातून आर्थिक उन्नती व्हावी या हेतूने हा जुन्नरचा समृद्ध वारसा डाक विभागाच्या माध्यमातातून व बायोस्फिअर्स संस्थेच्या पुढाकारातून सर्वदूर करण्याचा हा एक प्रामाणिक प्रयत्न आहे. देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त प्रशासन व शिवप्रेमींच्या एकत्रित प्रयत्नातून शिवरायांना एक अनोखे अभिवादन या निर्मितीच्या माध्यमातून केले आहे. या सचित्र पोस्टकार्डामुळे जनमानसात, अभ्यासकामध्ये, विशेषत: जगभरातील टपाल उत्पादने संग्राहकांमध्ये या शिवरायांच्या पवित्र जन्मभूमी व परिसरातील वारशाबाबत जनजागृती आणि कुतूहल निर्माण करण्याचे महत्वाचे काम होणार आहे. यानिमित्त महाराष्ट्रातील अशा अनेक समृद्ध वारशांबाबत संवर्धन व संशोधनाकरिता या नूतन अभियानासारखी भविष्यात नक्कीच निर्मिती करता येवू शकेल. त्यासाठी हे सचित्र पोस्टकार्ड नक्कीच पथदर्शी ठरेल.
सदर उपक्रमाला डोळस भटकंती करून उत्तम छायाचित्रे टिपणाऱ्या अनेक सहकाऱ्यांचे सहकार्य देखील लाभले. या पोस्ट कार्ड साठी रमेश खरमाळे, राजीव संत, सुधीर सावंत, श्रीधर रेड्डी, रेश्मा पिंगळे, सचिन पुणेकर त्यांनी टिपलेली महत्वाची छायाचित्र देण्यात आली आहेत. मराठा सेवा संघाचे विविध पदाधिकारी; डाक विभागाचे सन्माननीय अधिकारी बी.पी. एरंडे; सुकदेव मोरे; प्रमोद भोगडे आणि शिवभक्त – शिवप्रेमी अविनाश शिळीमकर, गणेश मानकर, केदार कुलकर्णी, दत्तात्रय गायकवाड, शैलेंद्र पटेल, अभिजित भसाळे आणि इतर अनेक शिवभक्तांचे मौलिक सहकार्य लाभले.