जिल्हा बँक निवडणुकीत संजय काळे आणि रघुनाथ लेंडे पुन्हा एकदा आमने सामने

जुन्नर | पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (PDCC Bank) निवडणुकीसाठी सोसायटी ‘अ’ गटातून राष्ट्रवादीचे नेते (NCP), जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संजय काळे व माजी सभापती रघुनाथ लेंडे यांच्यात लढत होणार असल्याचे मंगळवारी (दि.०७) रात्री उशिरा निश्चित झाले. जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती रघुनाथ लेंडे यांचा उमेदवारी अर्ज वैध असल्याचा निकाल निवडणूक निर्णय अधिकारी मिलिंद सोबले यांनी जाहीर केला. त्यामुळे संजय काळे व रघुनाथ लेंडे यांच्यातील लढतीचे चित्र स्पष्ट झाले.

जिल्हा बँक निवडणुकीसाठी संजय काळे व रघुनाथ लेंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. काळे यांना अनुमोदन दिलेल्या एका मतदाराने लेंडे यांनाही अनुमोदक म्हणून उमेदवारी अर्जावर सही केली होती. या बाबत काळे यांनी हरकत घेतली होती. मात्र निवडणूक अधिकारी सोबले यांनी ही हरकत फेटाळून लावून लेंडे यांचा अर्ज वैध असल्याचा निकाल दिला. त्यामुळे सभापती संजय काळे यांच्या बिनविरोध निवडीचे मनसुब्यांवर पाणी फेरले आहे.

माजी सभापती रघुनाथ लेंडे हे संजय काळे यांचे कट्टर राजकीय विरोधक मानले जातात. बँकेच्या मागील पंचवार्षिक निवडणुकीत लेंडे यांचा काळे यांनी पराभव केला होता. मागील दोन निवडणुकीत सभापती संजय काळे विजयी झाले होते. जिल्हा बँकेचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. काळे व लेंडे यांच्यात दुसऱ्यांदा लढत होत आहे. यामुळे या लढतीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.