पिंपरी चिंचवड भाजपला सलग तिसरा धक्का! तुषार कामठेंचाही नगरसेवक पदाचा राजीनामा

पिंपरी | आगामी महानगपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पिंपरी चिंचवड शहरातील राजकीय समीकरणे वेगाने बदलताना दिसून येत आहेत. महानगरपालिकेचा प्रभाग रचना प्रारूप आराखडा नुकताच जाहीर झाला आहे. आराखडा प्रसिद्ध झाल्यानंतर भाजपला गेल्या ७ दिवसांत तिसरा धक्का बसला आहे. भ्रष्टाचार विरोधी मोहीम उघडणारे भाजपचे (BJP) पिंपळे निलख भागाचे नगरसेवक तुषार कामठे (Corporator Tushar Kamthe) यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला आहे. यामुळे पिंपरी चिंचवड शहरात भाजपला गळती लागली आहे की काय? याबाबतच्या चर्चांना उधाण आले आहे. यापूर्वी भाजपचे नगरसेवक वसंत बोराटे यांनी भाजपाला रामराम करत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. त्यानंतर चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप यांच्या समर्थक नगरसेविका चंदा लोखंडे यांनीही आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा दिला.

दरम्यान, भाजपचे पिंपळे निलख प्रभागाचे नगरसेवक तुषार कामठे हे आता कोणत्या पक्षात प्रवेश करतात याकडे त्यांच्या समर्थकांचे लक्ष लागले आहे. गेल्या काही दिवसांपासून भाजप नगरसेवकांची राजीनामा देण्याची जणू स्पर्धा लागली आहे असे वातावरण निर्माण झाले आहे. तुषार कामठे हे देखील राष्ट्रवादीत प्रवेश करणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. कामठे यांनी भ्रष्टाचार प्रकरणी चौकशीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतलेल्या पक्ष विरहित भूमिकेबाबत शहरभर फलक लावून अजितदादांचे कौतुक केले होते. त्यानंतर स्थानिक राजकारणात सर्वांच्याच भुवया उंचावल्या होत्या. भाजप चे मोशीचे नगरसेवक वसंत बोराटे, पिंपळे गुरवच्या चंदा लोखंडे आणि आता तुषार कामठे असे सलग तीन धक्के सत्ताधारी भाजपला बसले आहेत. एकीकडे अजित पवार हे आपला गड पुन्हा काबीज करण्यासाठी उत्सुक असताना महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या काळात राष्ट्रवादीत आणखी किती इनकमिंग होतंय हे पाहणे महत्वाचे ठरेल.

Leave A Reply

Your email address will not be published.