परमबीर सिंग यांच्या ‘लेटर’चा फुसका ‘बॉम्ब’; अनिल देशमुखांविरुद्ध पुरावेच नाहीत?

मुंबई | मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटरबॉम्ब टाकून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर खंडणी वसुलीचा आरोप केला होता. याच प्रकरणात सोमवारी अनिल देशमुख यांना ईडीने अटक झाली होती. या सर्वात आता देशमुख यांच्याविरुद्ध पत्राच्या पलीकडे कोणताही पुरावा परमबीर यांच्याकडे नसल्याची माहिती समोर आली आहे.

परमबीर यांनी केलेल्या आरोपांची सीबीआय व ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली होती, त्याचवेळी राज्य सरकारनेही या प्रकरणात चौकशीचे आदेश दिले होते. निवृत्त न्यायमूर्ती कैलाश उत्तमचंद चांदिवाल यांचा एकसदस्यीय चौकशी आयोग सरकारने नेमला आहे. या आयोगासमोर परमबीर यांनी वकिलामार्फत आपलं प्रतिज्ञापत्र सादर केलं आहे. त्यात अनिल देशमुख यांच्याविरुद्ध आणखी कोणताही पुरावा माझ्याकडे नसल्याचे परमबीर यांनी नमूद केले आहे. सिंग यांच्या वकिलांनी या माहितीला दुजोरा दिला आहे. परमबीर यांनी हे प्रतिज्ञापत्र गेल्या सुनावणीच्यावेळी आयोगासमोर सादर केलं आहे, असेही या वकिलांनी सांगितले. विशेष सरकारी वकील शिशिर हिरे यांनीही याबाबत महत्त्वाची माहिती दिली. परमबीर सिंग यांनी देशमुख यांच्याविरुद्ध जे पत्र लिहिलं आहे त्यापलीकडे कोणताही पुरावा देण्यास नकार दिला आहे, असे हिरे यांनी सांगितले. परमबीर या प्रकरणात उलटतपासणीसही तयार नसल्याचे हिरे यांनी नमूद केले. दरम्यान आता अनिल देशमुख यांना अटक झाली असतानाच परमबीर यांचं हे प्रतिज्ञापत्र समोर आल्याने या संपूर्ण प्रकरणाला नवी वळण लागण्याची शक्यता आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.