कामगारांसाठी मी महाधिवक्त्यांशी बोलेन, पण संप मागे घ्या; अनिल परब यांचे कळकळीचं आवाहन
मुंबई | एसटी संघटनांच्या प्रतिनिधींनी मला राज्याच्या महाधिवक्त्यांशी चर्चा करायला सांगितलं आहे. एसटी कामगारांचा संप मिटावा म्हणून मी महाधिवक्त्यांशी चर्चा करेन. पण कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, असं आवाहन परिवहन मंत्री अनिल परब यांनी केले आहे. विलिनीकरणाची प्रक्रिया हि एक दोन दिवसात होणारी प्रक्रिया नाही. यासाठी नेमलेल्या समितीचा अहवाल आल्यावरच त्यावर निर्णय घेता येईल असंही परब यावेळी म्हणाले.
आज एसटी संघटनेचे पदाधिकारी आणि अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी अनिल परब यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर माध्यमांशी बोलताना परब यांनी हे आवाहन केले. सदावर्ते हे वकील आहेत. त्यांना कायदेशीर प्रक्रिया माहीत आहे. कोर्टाने जी समिती स्थापन केली. तिला पूर्ण अधिकार दिले आहे. कोर्टाने निर्णय दिलेले असताना त्यात फेरफार करता येणार नाही. समितीचा जो काही अहवाल येईल त्यावर आम्ही सकारात्मक निर्णय घेऊ असं परब यावेळी म्हणाले.