जेव्हा नेतृत्व सुशिक्षित व सुसंस्कृत असतं, तेव्हाच असे समाजहिताचे उपक्रम राबविले जातात
आजच्या धावपळीच्या युगात आपण स्वताच्या आरोग्याची काळजी म्हणावी तशी घेत नाही. घराचे हप्ते, गाडीचे EMI, मुलांचे खर्च, आई-वाडीलांची काळजी यामागे आपण स्वतःकडे पाहत नाही. तरुण पणी आपण ही आव्हान पार करतो, पण म्हातारपणी आजार डोकं वर काढतात आणि मग सुरू होतो खरा संघर्ष!
आरोग्य हा सार्वजनिक विषय आहे. दुर्दैवाने आजही भारतीय जनतेला आरोग्य हा त्यांचा मुलभूत अधिकार मिळाला नाही. त्यासाठी जे धोरणात्मक निर्णय घेतले जातात, त्यासाठी त्यावर काम करणारे लोकप्रतिनिधी आपण निवडून देण्यात कमी पडलोय का? आजही संसदेतील भाषण उघडुन पहा, नेमक किती खासदार आरोग्य विषयावर बोलतात! २४ मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, ८ डायग्नोस्टीक सेंटर, मेडिकल कॉलेज एकाच छताखाली यावे यासाठी देशाला दूरदर्शी ठरेल असा प्रकल्प संसदेत एका खासदाराने मांडला, पण केंद्राकडून त्यावर सकारात्मक कार्यवाही झाली नाही. याच खासदाराने IAS, IPS प्रमाणे IHS सारखी यंत्रणा उभी करावी, त्यातून उच्चशिक्षित डॉक्टरांच्या हाती आरोग्य प्रशासनाचा कारभार जावा, हा मुद्दा मांडला. संसदेत असे अभ्यासू मुद्दे मांडत असताना हा माणूस त्याच्या मतदासंघांत सुद्धा आरोग्य विषयक महत्वाचे उपक्रम राबवत असतो. अध्यात्माच्या माध्यमातून प्रबोधनाची पालखी वाहणाऱ्या वारकरी बांधवांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबिर राबवून त्यांना 6 लक्ष रुपयांचा वैद्यकीय विमा सुद्धा यांनी दिला. त्यासोबच रक्ताचा तुटवडा लक्षात घेऊन रक्तदान शिबीर आयोजित केले व प्रत्येक रक्तदात्यास टी शर्ट, पेन ड्राईव्ह नाही तर 6 लक्ष रुपयांचा आरोग्य विमा दिला.
समाजातील सर्वात दुर्लक्षित घटक म्हणजे महिला. महिलांमध्ये बदल घडवण्याची प्रचंड क्षमता असताना कोणतही सरकार त्यांच्याकडे गांभीर्याने पाहत नाही. आता बघा, ब्रेस्ट कॅन्सर अर्थात स्तनांचा कॅन्सर चे प्रमाण महिलांमध्ये खूप वाढले आहे. WHO ने सुद्धा याकडे भारताचे लक्ष वेधले, यावर ठोस कार्यक्रम हाती घेताना एकही खासदार आम्हाला दिसला नाही. पण संसदेत अभ्यासू मांडणी करणारा हाच खासदार पुन्हा पुढे आलाय व त्याने आपल्या मतदारसंघात ब्रेस्ट कॅन्सर स्क्रिनिंग कॅम्प सुरू केलाय! जर लवकर निदान झालं तर आपण हे जीव वाचवू शकतो! पण यासाठी हवी इच्छाशक्ती, तो बदल घडवण्यासाठी आणि ते लोकहिताचे उपक्रम राबविण्यासाठी!
एव्हाना आम्ही हे कोणत्या खासदाराविषयी बोलत आहोत, हे आपल्या ध्यानात आल असेल! पण तरीही ज्यांना समजल नाही त्यांना सांगणं आमचं कर्तव्य आहे. शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार ज्यांना पहिल्याच टर्म मध्ये तिसऱ्यांदा संसद रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे, ते डॉ अमोल कोल्हे! हा माणूस २०१९ पासून खासदार झाल्यापासून सातत्याने आरोग्य विषयाकडे गांभीर्याने पाहतोय, म्हणूनच तर आम्ही म्हटलं जेव्हा नेतृत्व अभ्यासू व सुसंस्कृत असतं तेव्हाच असे समाजहिताचे उपक्रम राबविले जातात!