भावी पोलिसांच्या मैदानी चाचणीला सुरुवात, पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत पदभरती

पोलीस शिपाई संवर्गातील रिक्त पदांसाठी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाकडून भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्याअंतर्गत ३० जानेवारी ते ६ फेब्रुवारी २०२३ या कालावधीत मैदानी चाचणी होत आहे. राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक ०२, वानवडी, हडपसर, पुणे येथील मैदानावर ही चाचणी घेण्यात येत आहे.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत २१६ पोलीस शिपाई पदांसाठी १५१४७ उमेदवारांनी अर्ज दिले. त्यातील १३९१६ उमेदवारांनी शुल्क भरले. या उमेदवारांना महा-आयटी यांच्याकडून ऑनलाइन प्रवेशपत्र देण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी त्यांना दिलेल्या तारखेस पहाटे पाच वाजता मैदानावर उपस्थित राहणे आवश्यक आहे. तसेच आवश्यक कागदपत्रांचे छायांकित-साक्षांकित प्रतीचे दोन संच, आयकार्ड आकाराचे १० फोटो उमेदवारांनी सोबत आणावेत, भरती प्रक्रियेबाबत दिलेल्या सूचनांचे उमेदवारांनी पालन करावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

अपर आयुक्त डॉ. संजय शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली भरती प्रक्रिया होत आहे. भरतीसाठी कोणाच्याही आमिषाला किंवा कोणत्याही प्रलोभनाला बळी पडू नये. भरती करून देण्याबाबत कोणी अमिष दाखवत असल्यास अशा व्यक्तींच्या भुलथापांना उमेदवारांनी बळी पडू नये. असे प्रकार आढळून आल्यास पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे यांना ९५२९६९१९६६ तर सह आयुक्त मनोज लोहिया यांना ७९७७८९०८९७ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी केले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.